नाशिकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तीन स्वतंत्र कक्ष
जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रूग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रूग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरीत व्हावी यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत व माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक मनपा हद्दीतील संपूर्ण व्यवस्थेचे संनियंत्रण महानगरपालिकेकडून केले जाणार असून ग्रामीण भागाचे संनियंत्रण जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून केले जाणार आहे. मालेगाव महापालिका व लगतच्या परिसराचे सनियंत्रण अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडून केले जाणार आहे. प्रत्येक पुरवठादारांकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची माहिती एफडीए च्या अधिकाऱ्यांकडून दर तीन तासांनी या मदत व माहिती कक्षास उपलब्ध होईल. त्या-त्या हद्दितील रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चौकशी करण्यासाठी व त्यासंबंधीच्या इतर माहितीसाठी वरीलप्रमाणे मदत कक्षास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात कोवीड बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील पुरवठादाराकडे ज्याप्रमाणे टँकर प्राप्त होतील तसे रुग्णालयांनी त्या-त्या पुरवठादारांशी संपर्क करून योग्य प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्या पुरवठादारांकडून ऑक्सिजन उपलब्ध आहे याची माहिती रुग्णालयांना सुलभरीत्या व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नाशिक महानगरपालिका हद्दितील रुग्णालयांसाठी – 0253 -2220800
मालेगांव महानगरपालिका हद्दितील रुग्णालयांसाठी – 8956443068 व 8956443070
नाशिक ग्रामिण हद्दितील रुग्णालयांसाठी – 9405869940