अवनीचे बछडे दिसले, वनविभागाची माहिती
पूर्ण देशात अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी संताप व्यक्त होतो आहे. यातच तिचे लहान बछडे जिवंत आहेत की नाही यावरून सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. मात्र आता थोडी दिलासा देणारी बातमी आहे. नरभक्षक टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या अनाथ झालेल्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने युद्धस्तरावर शोधमोहिम सुरू केली आहे. गुरुवारी पेट्रोलिंग करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने यवतमाळमधील विहिरगावजवळ टी-१ वाघिणीचे बछडे रस्ता ओलांडताना दिसल्याचा दावा केला आहे.पांढरकवड्यातील या वाघिणीला वनखात्याने टी-१ हे नाव दिले होते. मात्र, या परिसरातील ही वाघीण ‘अवनी’याच नावाने ओळखली जात होती.बछड्यांचा शोध घेण्यासाठी सराटी, बोराटी, वरूड, भुलगड आदी भागातील जंगल परिसर पिंजून काढत आहे. टी-१ वाघिणीसोबत राहणारा नर वाघसुद्धा याच परिसरात आहे. या बछड्यांना तातडीने बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. या बछड्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता वनविभागासमोर आहे. त्यामुळे जोपर्यंत नागरिकांना आणि प्राणी मित्रांना हे दोघे दिसत नाही तो पर्यंत सरकारवर टीका सुरूच राहणार आहे.