सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा
रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवरे धरण फुटल्याने परिसरातील सात गावे पाण्याखाली गेली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत.
मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागले होते. काही वेळाने धरणाला भगदाड पडल्याचे लक्षात आल्याने तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटले आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरले होते. बेंड वाडीतील काही ग्रामस्थ वाहून गेले. आतापर्यंत सातजणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच, विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी अनास्थेचे हे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे.
जलसंपदामंत्र्यांनी राजीनामा द्यावा
सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिवसेनेचे आदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळे आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.