1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (08:15 IST)

सरकारवर आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; दीपिका चव्हाण यांची चित्रा वाघवर टीका

देशातील भाजपशासित राज्यात महिलांवर बेसुमार अत्याचार सुरू आहेत. फडणवीसांच्या काळात गँगरेप व खुनाच्या ४७ घटना घडल्याने महिला अत्याचारात २०१९ मध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबवून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपशासित राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची खरमरीत टिका राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
 
नाशिक दौर्‍यावर आलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी  पत्रकार परिषदेत महिला अत्याचारासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या सौ.चव्हाण यांनी आज उत्तर दिले. यावेळी बोलताना सौ.चव्हाण म्हणाल्या, ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, त्या राज्यात महिलांना सन्मान मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उत्तरप्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, हरयाणा व कर्नाटक या भाजपशासित राज्यात गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेच्या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न योगी सरकारने केला. २०१६ मधील कोपर्डीच्या घटनेनंतर तत्कालीन फडणवीस सरकारला धारेवर धरणार्‍या सुप्रियाताईंमुळेच आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली. फडणवीस सरकारच्या काळात २०१५ साली ३१,२१६ घटना, २०१६ साली ३१,३८८, २०१७ साली ३१,९७८, २०१८ साली ३५,४९७ तर २०१९ साली ३७,१४४ महिलांवर अत्याचार झाले. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले होते. मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर २०२० पासून महिला अत्याचार, सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.
 
महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे चित्राताई आपण मोठ्या झाल्या. पक्षाने आपल्याला महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद देऊन सन्मान दिला. हे आपण विसरल्या आहात. फडणवीस सरकारने पती किशोर वाघ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्यामुळे ती कारवाई होऊ नये यासाठी ज्या बापाने आपल्याला मोठं केलं, त्याच बापाला विसरून आपण पक्षच बदलला. नाइलाजाने पक्षांतर करताना आपल्याला रडताना संपूर्ण देशाने पाहिले आहे. आणि त्यानंतर भाजपात स्वत:चे महत्व वाढावे म्हणून महाविकास आघाडी सरकारसह आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने बिनबुडाचे आरोप करणे, हे योग्य नाही. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच महाविकास आघाडी सरकारबाबत वारंवार अशोभनीय वक्तव्य करण्याचा दुटप्पीपणा आपल्याला कसा जमत असेल?, असा प्रश्नही टिका करताना चव्हाण यांनी उपस्थित केला.