बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्रातील शहरांना विकासाची इंजिने बनवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘शहरे ही विकासाची इंजिने बनली पाहिजेत, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना आम्ही अमलात आणत आहोत. देशाची शहरे ६५ टक्के जीडीपी तयार करतात. क्रयशक्ती वाढली की शहरे चांगली होतात. गुंतवणूक येते. रोजगार निर्मिती होते. महाराष्ट्राला याच विकासाच्या महामार्गाने महायुतीचे सरकार नेते आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे केले. 
 
अमरावती मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुनील देशमुख, बडनेरा मतदारसंघातील उमेदवार प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘अमरावतीत मी सर्वाधिक वेळेला आलेला मुख्यमंत्री आहे. अमरावती माझे आजोळ आहे. या शहरावर माझे प्रेम आहेच पण नागपूरनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर म्हणून महायुतीच्या सरकारने कामाचा बॅकलॉग संपवून अमरावतीला विकासाच्या मार्गावर आणले आहे. देशातले आधुनिक शहर बनविण्याच्या दिशेने अमरावती शहराला आम्ही पुढे नेत आहोत. त्रयस्थ शहरांच्या सर्वेक्षणात देशातल्या १११ शहरांमध्ये अमरावती १६ व्या क्रमांकावर आणले. येथे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. महायुती सरकारच्या काळात शहरे, गावे बदलायला सुरवात झाली आहे.’ ‘महायुतीच्या सरकारने ५ वर्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारपेक्षा १५ वर्षांपेक्षा दुप्पट काम केले,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आघाडी सरकारच्या काळात एकही शहर हगणदारी मुक्त नव्हते. आम्ही सर्व शहरे हगणदारीमुक्त केली. 
 
५० शहरांमध्ये १०० टक्के घनकचरा व्यवस्थापन केले. १०० शहरांमध्ये ८० टक्के घनकचरा व्यवस्थापन केले. भूयारी गटारे योजना, पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्या. अमरावती शहरातही भूयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याची योजना केल्या. मोठ्या प्रमाणावर निधी अमरावतीला दिला. आम्ही पुढच्या ५० वर्षांचे शहराचे नियोजन करून विकास करतो आहोत.’ ‘महायुती सरकारने शहरांमध्ये झोपडपट्ट्या नियमित केल्या आहेत. तेथे मालकी हक्काचा पट्टा देतो आहोत. सरकारी मालकीच्या जमिनीवर घर असेल तर त्याला पक्के घर देतो आहोत. नुसत्या झोपडपट्ट्या हटवून किंवा झोपडपट्टीवासीयांना बेघर करून नाही तर झोपडपट्टीवासीयांना मालकीची पक्की घरे देऊन शहरे झोपडपट्टीमुक्त करणार आहोत, अशी खात्री मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
‘दुष्काळमुक्त महाराष्ट्राची आणि एक कोटी युवकांना रोजगार देण्याची सर्वांत मोठी घोषणा भाजपच्या संकल्प पत्रात केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘नांदगावातील इंडिया बूल सोडली तर तेथे कोणता उद्योग नव्हता. तेथे महायुती सरकारने इंटीग्रिटेड इंडस्ट्रीयल पार्क तयार केले. आज तेथे १९ उद्योग सुरू असून ३० हजार लोकांना रोजगार मिळतो आहे. येथील गुंतवणुक वाढली की अजून ५० हजार लोकांना रोजगार मिळेल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.विदर्भात उद्योग आले पाहिजेत. विदर्भात वीजनिर्मिती होते. महायुतीचे सरकार विदर्भाच्या उद्योगाला तीन रुपये कमी दराने वीज देते, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. मुखेडमध्ये आमदार तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. ते म्हणाले, ‘तळमळ असलेला विधानसभेत चांगली कामगिरी असणारा हा आमदार आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी तुषार राठोड कोर्टात गेले आहेत. सरकारने त्यांचीच बाजू कोर्टात घेतली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पीकविम्याचे पैसे नक्की मिळतील. लेंडी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे काम वर्षभरात पूर्ण करून प्रकल्पालाही पैसा देऊ.’ तुषार राठोड यांना प्रचंड मतांनी निवडून यायचे असेल तर त्यांनी काँग्रेस उमेदवाराला सांगून राहुल गांधींची सभा येथे लावून घ्यावी, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.