रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:40 IST)

देशातल्या पहिल्या संरक्षण अँकॅडमीसह ७२ वसतिगृहांची स्थापना करणार : भुजबळ

chagan bhujbal
फक्त नायगावमध्येच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मर्यादित न ठेवता देशभरात आणि जगभरात त्यांचे विचार व कार्य पोहचविले पाहिजे.सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या नायगावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून महाराष्ट्र शासन व महाज्योतीच्या वतीने राज्यभरात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ७२ वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली. सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्ताने नायगाव जि. सातारा या त्यांच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,पंकज भुजबळ,सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबूले प्रा.हरी नरके,बापूसाहेब भुजबळ,महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे,राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,पंचायत समिती सभापती अश्विनी पवार, राजेंद्र नेवसे, सरपंच पुनम नेवसे, वंदना धायगुडे, दिपाली साळुंखे, दिलीप खैरे, कल्याण आखाडे,बाळासाहेब कर्डक, प्रित्येश गवळी, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, समाधान जेजुरकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पी.एच.डी. प्राप्त झालेल्या डॉ.नूतन नेवसे यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्ञान संकुल नायगाव येथे महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून देशातील पहिली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अॅकॅडमी स्थापन करून याठिकाणी एनडीए व स्पर्धा पूर्व परिक्षा निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी येथील ग्रामस्थांची मदत देखील शासनास अतिशय उपयुक्त असणार आहे. या प्रशिक्षण संकुलासाठी व विविध बाबींचा विकास करण्यासाठी ओबीसी मंत्रालय व शासनाकडे ५० कोटी रुपयांचा आराखडा पाठविण्यात आलेला आहे. यामाध्यमातून नायगाव येथे निवासी प्रशिक्षण संस्था, निवासी शाळा व अन्य बाबींचा विकास महाज्योती संस्थेच्या माध्यमातून करण्यासोबत नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सुद्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची अद्ययावत अशा प्रकारची शाळा महाज्योती संस्थेच्या वतीने विकसित करण्यात येईल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावाचा विकास करणे व नायगाव येथे अद्यावयावत ज्ञानसंकुल उभे करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की,बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांना समान हक्क मिळवून देण्याचे काम महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. त्याचे आभार मानण्यासाठी आपण या भूमीला वंदन करतो. या दाम्पत्याने सर्वांना समान हक्क मिळविण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांनतर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आरक्षण देण्याचे काम सर्व प्रथम शाहू महाराज यांनी केले. त्याचे देशव्यापी काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची ऍलर्जी त्या काळातही काही लोकांना होती आणि आजही काही लोकांना ती ऍलर्जी आहे. मात्र आपल्याला त्याकडे लक्ष न देता आपल्याला पुढे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबतच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देखील प्रयत्न करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. नायगाव येथील पर्यटन केंद्राची संपूर्ण जबाबदारी महाज्योतीकडे घेऊन याठिकाणी अधिक विकास करण्याबाबत लक्ष देण्यात येईल तसेच भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. ही अखंड हिंदुस्थानातली स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा होती. याच भिडे वाड्यात आपण लवकरच ‘सावित्रीबाई आद्य मुलींची शाळा’ सुरु करण्यात येणार आहे. याबाबत बैठका देखील पार पडल्या असून लवकरच या स्मारकाचा विकास करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.