लातूर, धाराशिवमध्ये मुसळधार
पावसाळ््याच्या सुरुवातीपासून लातूर, धाराशिवकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे आतापर्यंत रिमझीम पावसावरच पिके तरली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला होता. मात्र, रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, रस्ते तुडुंब भरून वाहू लागले. तसेच प्रथमच नाले, ओढे प्रवाही झाले. यंदा प्रथमच दोन्ही जिल्ह्यांत एवढा मोठा पाऊस झाला. आणखी काही दिवस असाच पाऊस राहिल्यास दोन्ही जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागू शकतो. आजच्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांना दिलासा मिळाला.
लातूर तालुक्यासह जिल्ह्यात औसा, उदगीर, देवणी, चाकूर, रेणापूर तालुक्यांत रविवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. जळकोट, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस तर निलंगा तालुक्यात पाऊस पडला नाही. लातूर शहरात दुपारी पावसाला सुरुवात झाली. थोडावेळ विश्रांती घेऊन रात्री ७.३० च्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. मेघगर्जनेसह मोठा पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. यंदाच्या पावसाळ्यात अद्यापपर्यंत सलग आणि दमदार पाऊस पडलेला नव्हता. सलग तीन महिने रिमझीम ते मध्यम स्वरुपाचाच पाऊस राहिल्याने मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांची पाणी पातळी तळाला गेली आहे. तसेच नदी, ओढेही वाहिले नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. मात्र, आजच्या पावसाने दिलासा मिळाला.