शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (09:57 IST)

त्र्यंबकेश्वर – संचारबंदीचं पालन करीत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी

संचारबंदीचं तंतोतंत पालन करीत हरिनामाचा जयघोष आणी भगवद् गितेतील श्लोक म्हणत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची उटी  लावण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी भाविकांविना उटी लावण्यात आली.
 
भुतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तीभावनेतुन चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहा तील विठ्ठल, रुक्मीणी, आदिशक्ती  मुक्ताबाई यांच्या मुर्तीना चंदनाच्या उटीचे पारंपारीक पध्दतीने लेपन करण्यात येते  सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे .
 
या निमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. त्या अंतर्गत सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासुन उटी तयार करतात. लहान मुले व पुरुष देखील या कार्यात सहभाग घेतात.  एकादशी पर्यंत चारही देवतांना पुर्णपणे लेपन होईल एवढी चंदनाची उटी तयार होते.मात्र यावर्षी देशाभर कोरोना व्हायरसचे तांडव सुरु आहे. यापासुन होणारा संसर्ग टाळण्यासाठी  श्री निवृत्तिनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज होणारी उटीची वारी देखील मागील वर्षाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. संचारबंदी मुळे बाहेरगावाहुन कोणीही भाविक येणार नाही. त्यामुळे पौर्णिमे पासूनच संस्थानचे पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी व त्यांचे कुटुंबिय, मंदिरातील सेवेकरी, कर्मचारी हे गेले दहा दिवसांपासुन  चंदनाची उटी तयार करीत होते. तसेच परंपरागत पध्दतीने गोसावी परिवाराने पारायण सप्ताह संपन्न केला.
 
नाथांच्या समाधीची पंचोपचारे पुजा व अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी ठिक दोन वाजता पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी  लावण्यास प्रारंभ करण्यात आला. योगेश गोसावी, सच्चिदानंद गोसावी, रश्मी गोसावी, विजय धारणे, ज्ञानेश्वरी गोसावी-धारणे आदींनी देवांना ऊटी लावली. यावेळी संस्थान प्रशासकीय समितीचे कृष्णा सोनवणे, नगर परिषद मुख्याधिकारी संजय जाधव, ह.भ.प. अॅड. भाऊसाहेब गंभीरे, ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.  यानंतर देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला. नैवेद्य अर्पण करुन आरती करण्यात आली.