शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 मे 2020 (08:56 IST)

वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून शिवशाही पंढरपूरला जाणार

त्र्यंबकेश्वर येथून श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ ला दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. यंदा कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन दिंडी सोहळा स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. आता शासनाच्या आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला शिवशाही बसमधून फक्त २० मानकरी पालखीसह पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. याबाबत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
 
ज्येष्ठ पौणिर्मेस अथवा दुसऱ्या दिवशी पालखी प्रस्थान होत असते आणि आषाढ शुद्ध नवमीस पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर जाऊन ठेपतो. जवळपास २७ दिवसांचा हा प्रवास असतो. यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हजारो वारकरी एकत्र येवून समुहाने पायी पालखी सोहळा करणे शक्य होणार नाही. त्याकरिता विश्वस्त मंडळाने पालखीचे पारंपरिक मानकरी मोहन महाराज बेलापूरकर आणि बाळासाहेब डावरे महाराज तसेच पुजारी जयंतमहाराज गोसावी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्तांच्या बैठक झाली. शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संत निवृत्तीनाथांच्या पादुका वाहनातून घेऊन जाणार आहेत. त्याकरिता शासनाने शिवशाही बस देण्याची विनंती करण्यात आली आहे. शिवशाही बसमध्ये पालखी घेऊन २० वारकरी जातील, असा प्रस्ताव प्रस्ताव देण्यात आल्याचे पवनकुमार भुतडा यांनी सांगितले. सदर दिंडीचे दशमीला पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर दि. ३० रोजी मुक्काम व दुसºया दिवशी देवशयनी आषाढी एकादशीला पंढरपूर यात्रा दर्शनादी सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा बसनेच त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करणार आहे.