शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (21:35 IST)

येत्या २ एप्रिलला मुंबई मेट्रोलच्या दोन नव्या मार्गिकेचे उद्घाटन होणार

गुढीपाडव्याला अर्थात २ एप्रिलला मुंबई मेट्रोलच्या दोन नव्या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मुंबई मेट्रोच्या ७ आणि २ए या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे. मुंबई मेट्रो ७ दहिसरहून अंधेरी पूर्व आणि मुंबई मेट्रो २ए दहिसरहून अंधेरी पश्चिम डी.एननगरपर्यंत धावणार आहेत. यामुळे आता मुंबईकरांची वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी दूर होणार आहे. या दोन्ही मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात २० किलोमीटर ट्रॅकवर सेवा सुरू केल्या जात आहेत. दुसऱ्या टप्प्यात पुढील १५ किलोमीटरपर्यंत ट्रॅक सुरू होतील.
 
अजूनही काही मेट्रो स्टेशनची काम पूर्ण झाली नाहीये. ही काम पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सेवा सुरू केल्या जातील. दरम्यान तिकिटाचे दर किमान १० रुपये आणि कमाल ८० रुपये ठेवले आहेत.
 
२ए मार्गिकेवर ‘या’ स्टेशनवरून धावणार मेट्रो ट्रेन
मेट्रो २एचे एकूण लांबी १८.५ किलोमीटर आहे. हा मार्ग दहिसरपासून ते डीएन नगर पश्चिमपर्यंत आहे. या मार्गावर दहिसर पूर्व, अपर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, गोरेगाव पश्चिम, ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डी एन नगर ही स्टेशन असतील.
 
७ मार्गिकेवर ‘या’ स्टेशनवरून धावणार मेट्रो ट्रेन
मेट्रो ७वर १४ स्टेशन असतील. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क), देवीपाडा, मागाठणे, बोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व, शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्टेशनचा समावेश ७ मार्गिकेवर आहे.
 
मेट्रो २ए आणि मेट्रो ७ साठी पहिल्या टप्प्यात एकूण १० मेट्रो ट्रेनचा वापर केला जाईल. गेल्या काही महिन्यांपासून या ट्रेनची चाचणी सुरू आहे. यांना सेफ्टी क्लिअरेंस मिळाला आहे. अशाप्रकारे या ट्रेन प्रवाशांच्या ने-आण करण्यासाठी तयार आहेत. पहिल्या टप्प्यात मेट्रोचे व्यवस्थापन आणि यांना चालवण्याची जबाबदारी एका स्वतंत्र संस्थेला दिली आहे. एमएमआरडीएच्या नेतृत्वातील ही संस्था असून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता मेट्रो धावण्यासाठी पूर्णपणे तयारी झाली आहे.