उदयनराजे भोसले यांचा महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा
"मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल", असं वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.
"मराठा आरक्षणावरुन होणारं राजकारण थांबायला हवं. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. नरेंद्र पाटलांनी आज अण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांचं आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केलं आहे. आपल्याकडे पुढची पिढी आशेनं पाहते आहे. त्यामुळे मला नेत्यांना विनंती करायचीय की लोकांचा अंत पाहू नका, एकदा का उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक एक दिवस नक्की होईल", असं उदयनराजे म्हणाले.
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही उदयनराजे यांनी भाष्य केलं. "दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही?", असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला. सर्वांना वाटतं मराठा समाज फार सधन आहे. मात्र, मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट आहे ही वस्तुस्थिती स्वीकारायला हवी. आज जास्त मार्क मिळवूनही विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे, असंही उदयनराजे म्हणाले.