शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (20:07 IST)

उद्धवपंतांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न आजतरी दिवास्वप्नच

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांचा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान बनण्याच्या लायकीचे व्यक्तिमत्व आहे अश्या आशयाचे विधान केले. हे विधान ऐकून गत ३० वर्षांपासून महाराष्ट्रातून पंतप्रधानपदासाठी दावा करणारे दुसरे दावेदार आणि सत्तारूढ महाआघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याचीही बातमी माध्यमात प्रसारित झाली आहे.
  
लोकशाही व्यवस्थेत देशाच्या सर्वोच्च पदी पोहाचण्याचे स्वप्न कोणालाही पडू शकते, त्यात वावगे काहीही नाही. राजकारणात असलेल्या व्यक्तीच्या समर्थक आणि हितचिंतकणांनाही ते स्वप्न बघण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असे स्वप्न संजय राऊतांना पडत असेल तर त्यात वावगे काहीही नाही. मात्र असे घडण्याची शक्यता किती आहेत हे तपासून बघणे तितकेच गरजेचे आहे.
 
भारताचा पंतप्रधान बनण्यासाठी उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊत म्हणतात तसे आवश्यक ते गुण असतीलही मात्र, तशी परिस्थिती आहे का? हे तपासून बघितल्यास आज तरी उत्तर नकारार्थीच मिळते. या विधानाच्या पुष्ट्यर्थ भारताच्या आजवर पंतप्रधानपदी पोहोचलेल्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्यापासून तर थेट नरेंद्र दामोदरदास मोदींपर्यंत सर्वच व्यक्तींना अभ्यासल्यास या सर्वांना पंतप्रधान बनण्याआधीच राष्ट्रीय स्तरावर कुठेतरी स्वीकारार्हता होती यात अपवाद जनता दलाचे एच डी देवेगौडा यांचा करता येऊ शकेल मात्र, देवेगौडांच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्हता नसली तरी त्या काळात जनता दल या पक्षाला स्वीकारार्हता होती. ज्यावेळी देवेगौडा पंतप्रधान झाले त्यावेळी जनता दलाचे ५० च्या आसपास खासदार लोकसभेत होते. देशाच्या विभिन्न राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाला काही ना काही अस्तित्व होते. १९८९ मध्ये जनता दल या पक्षाला घसघशीत जागा मिळाल्याने विश्वनाथ प्रताप सिंह हे त्यांचे नेते काही काळ तरी पंतप्रधान बनले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला महाराष्ट्र वगळता कुठेही फारसे स्थान नाही. महाराष्ट्रातही शिवसेना कधी स्वबळावर तर कधी भाजपच्या मदतीने लढूनही २० पेक्षा अधिक खासदार संसदेत नेऊ शकली नाही. विधानसभेतही स्वबळावर सत्ता मिळवणे शिवसेनेला शक्य झालेले नाही.
 
अश्या परिस्थितीत उद्धवपंतांना पंतप्रधान बनणे हे कितपत शक्य आहे, याचा अभ्यास संजय राऊत यांनी करायला हवा मात्र  संजय राऊत हे निर्धास्तपणे विधान करून टाकायचे आणि नंतर इतरांना त्याचा किस पाडू द्यायचा या मानसिकतेतले आहे यामुळे त्यांनी हे विधान करून टाकले असावे.  
जी परिस्थिती उद्धव ठाकरेंची तशीच थोड्याफार फरकात शरद पवारांचीही आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही पश्चिम महाराष्ट्र वगळता कुठे फारसे स्थान नाही नाही म्हणायला तोडजोडीच्या राजकारणात पवारांना संसदेत जाण्याची आणि केंद्रात मंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली आहे,त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची एक प्रतिमा तरी तयार झालेली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर देशभरात असलेल्या सर्व लहान मोठ्या पक्षांशी आणि त्यांच्या नेत्यांशी पवारांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंचे पवारांइतके चांगले संबंधही नाहीत.
 
दुसरे असे की पवारांना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनू द्यायचे नसल्यामुळे आणि त्यांना स्वतःला मुख्यमंत्री बनायचे नसल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले मात्र त्यांचे स्वतःचेच पंतप्रधान बनण्याचे स्वप्न असल्यामुळे या मुद्द्यावर ते कधीच उद्धव ठाकरेंना साथ देणार नाहीत.
 
देशात पंतप्रधान पदाचे स्वप्न बघणारे पवारांसारखे नेते प्रत्येक राज्यात आहेत, बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये यादव पिता-पुत्र, कर्नाटकात देवेगौडा यांच्यासह डझनभर तरी नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. शिवाय राहुल आणि प्रियांका हे बहीण भाऊ तर पहिल्या क्रमांकावर तयार आहेत. सर्व विरोधकांची मोट बांधून भाजपला पराभूत करायचे आणि विरोधकांचा पंतप्रधान बनवायचा या;अशी शरद पवारांची योजना आहे. या योजनेनुसार ते भाजपचा पराभव करतीलही मात्र त्यानंतर  पसंतप्रधान कुणी बनावे यावर एकमत होईल काय? हा खरा कळीचा मुद्दा आहे. एकमत झालेही तरी ते एकमत किती दिवस टिकेल हाही प्रश्नच आहे. म्हणजे दर सहा महिन्याला नवा पंतप्रधान असा प्रकार होऊ शकतो. विरोधकांच्या या भाजपविरोधी आघाडीत उद्धवपंत आणि तुसांची शिवसेना सहभागी झालीही तरी आघाडीतील इतर सर्व दिग्गज उद्धवपंतांना किती पुढे सरकू देतील हेही सांगता येत नाही.
 
शिवसेनेचा इतिहास तपासल्यास शिवसेना हा पक्ष मराठी माणसाचे हित जोपासण्यासाठी उभा केला गेलेला पक्ष आहे हे हित जोपासताना शिवसेनेने परप्रातीयांचा केलेला आकस हादेखील जगजाहीर आहे, त्यामुळे इतर राज्यांमधले नेते हे शिवसेनेच्या मित्रांपेक्षा त्यांचे शत्रूच जास्त झाले आहेत. १९८५  नंतर शिवसेनेने मराठी माणसाची कास सोडत कडवे हिंदुत्व जवळ केले, त्यामुळे ३० वर्ष भाजपसोबत ते राहिले २०१९ची निवडणूक हीदेखील त्यांनी भाजपसोबतच लढवली होती या सर्व काळात त्यांनी या सर्व कथित पुरोगामी पक्षांशी मांडलेला उभा दावा आणि त्यांच्यावर सोडलेले टीकास्त्र हेदेखील पवारांच्या आघाडीतील हे पक्ष विसरलेले नाहीत आजदेखील  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निधार्मीक पक्षांशी त्यांनी केलेली युती ही फक्त सत्तेसाठी आहे हे शेम्बडे पोरंही सांगेल त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवरही कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  अश्या परिस्थितीत हे नेते उद्धवपंतांना पंतप्रधान म्हणून पुढे सरकू देतील काय? हे आज सांगणे कठीण आहे.
 
देशाचे पंतप्रधानपद सांभाळायचे तर त्या व्यक्तीला  प्रशासनाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्याचबरोबर देशभरातील समस्यांचा संपूर्ण अभ्यास असायला हवा, तो अभ्यास उद्धव ठाकरेंना कितपत आहे? हेही तपासायला हवे. आजवरचे पंतप्रधान बघितल्यास बहुतेक सर्वानाच  राज्यात आणि केंद्रात महत्वपूर्ण पदांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव होता, त्याचबरोबर राष्ट्रीय राजकारणाशी हि सगळी मंडळी जुळलेली  होती. शरद पवारांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास राज्यात दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून काम केल्यावर केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री अश्या पदांवर त्यांनी काम केले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदही काही काळ त्यांनी भूषविले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसला जरी राष्ट्रव्यापी मान्यता नसली तरी त्यानिमित्ताने त्यांनी देशभर संपर्क प्रस्थापित केले आहेत. हीच बाब ममता बॅनर्जी, मायावती, लालूप्रसाद यादव यांच्याबाबतही आहे. उद्धव ठाकरे हे आजवर सत्तेच्या राजकारणात कधीच नव्हते. मुख्यमंत्रीपदही अपघातानेच त्यांच्याकडे आले. अनुभव म्हणाल तर त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी शिवसेनेतील मनोहर जोशी, नारायण राणे(माजी शिवसैनिक), सुभाष देसाई ही नावे सांगता येतील. अश्या परिस्थितीत अनुभवाच्या बाबतीतही उद्धवपंत कितपत निकषांवर उतरतील हा प्रश्नच आहे.
 
तरीही संजय राऊत यांना उद्धवपंतांमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता दिसते आहे ही बाब विशेष मानावी लागेल आधीच नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीत सर्वोच्च पदी जाण्याचे स्वप्न बघण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे संजय राऊत यांचाही तो अधिकार आपल्याला नाकारता येणार नाही, मात्र त्यावेळी या सर्व अडचणींवर मात कशी करता येईल? आणि  यातून मार्ग काढून  उद्धवपंतांना पंतप्रधान पदापर्यंत कसे पोहोचवता येईल याचे नियोजन संजय राऊतांना करावे लागणार आहे. तोपर्यंत  तरी उद्धवपंतांचे पंतप्रधानपद हे दिवास्वप्नच ठरणार आहे.
असे असले तरी संजय राऊत यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा....
 
 तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
 
ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
 
अविनाश पाठक