उद्धव ठाकरेयांच्याकडे 125 कोटींची संपत्ती
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल प्रतिज्ञापत्रात नमूद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले असून त्यांच्याकडे जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली असून ठाकरे यांचे प्रतिज्ञापत्र अद्याप निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेले नाही.
ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीवरून अनेक प्रश्न वारंवार उपस्थित केले गेले. ठाकरे प्रत्यक्ष निवडणूक लढवत नसल्याने संपत्ती जाहीर करण्याची कधी वेळही आली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आधी आदित्य ठाकरे यांनी तर आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक प्रक्रिेयाचा भाग म्हणून आपली संपत्ती जाहीर केली. यानिमित्ताने प्रथमच ठाकरेंच्या संपत्तीचा तपशील जाहीर झाला.
उद्धव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे असे एकही वाहन नाही. त्यांच्या मालकीचे मुंबईत दोन बंगले आहेत. वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगला तसेच तिथून जवळच साकारलेला नवा बंगला आणि कर्जत येथील फॉर्महाऊस याचा तपशील त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिला आहे. विविध कंपन्यांचे शेअर्स, कंपन्यांमधील भागिदारी आणि त्यांचे डिव्हिडंड हे उत्पन्नाचे स्रोत असल्याची नोंदही यात आहे. उद्धव यांच्याकडे चल आणि अचल अशी जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व तक्रारींचाही तपशील देण्यात आला आहे. उद्धव यांच्याविरुद्ध एकूण 23 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 12 गुन्हे रद्द झालेले आहेत तर अन्य खासगी तक्रारी आहेत.