सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (16:56 IST)

उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?

uddhav theckeray
महाराष्ट्रात भाजपला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी जाहीर सभांची सुरुवात रविवारी (2 एप्रिल) छत्रपती संभाजी नगर येथून झाली. 'वज्रमुठ' असं या सभेला नाव देण्यात आलं होतं. मविआची ही पहिलीच सभा असल्याने सर्वांच या सभेकडे लक्ष होतंच आणि यानुसार सभेत अशा काही गोष्टी घडल्या की सभेनंतर सर्वांचंच लक्ष या घडामोडींनी वेधून घेतलं.  हे निरीक्षण म्हणजे महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांना दिलेलं विशेष महत्त्व.
 
यामुळे आता महाविकास आघाडीचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे का? मविआचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे असतील का? आणि महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट का केलं जात आहे? असे स्वाभाविक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. 
 
उद्धव ठाकरेंना सभेत विशेष स्थान
संभाजीनगर हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महाविकास आघाडीने आपल्या नवीन रणनीतची सुरुवात इथूनच करायचं ठरवलं आणि याप्रमाणे सभा यशस्वी सुद्धा झाली.
 
मविआच्या या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पण या सर्व नेत्यांच्या उपस्थितीतही उद्धव ठाकरे यांचं स्थान विशेष होतं हे सभेत ठळकपणे दिसलं.

सभेच्या व्यासपीठावरील मोठ्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो सर्वात मोठा होता आणि केंद्रस्थानी होता. या फोटोच्या एका बाजूला सोनिया गांधी आणि शरद पवार तर दुसऱ्याबाजूला अजित पवार आणि नाना पटोले यांचे तुलनेने लहान फोटो होते.
 
शिवाय, व्यासपीठावरील आसन व्यवस्थासुद्धा अशाचपद्धतीने केली होती. उद्धव ठाकरे यांची खुर्ची इतर खुर्च्यांपेक्षा वेगळी आणि ती व्यासपीठाच्या मध्यस्थानी होती.कोणत्याही राजकीय सभेत सर्वांत शेवटचं भाषण हे त्या पक्षाच्या प्रमुख नेत्याचं असतं. महाविकास आघाडीच्या या सभेतही सर्वांत शेवटी उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं. उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले तेव्हा इतर सर्व नेते उभे राहीले आणि उद्धव ठाकरे स्थानापन्न झाल्यावरच इतर नेते बसले.
 
काहीवेळातच उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू झालं. भाषण सुरू होताच आतिषबाजी करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. तसंच उद्धव ठाकरे यांचं भाषण सर्वाधिक वेळ चाललं.
 
इतकच नाही तर अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचं कौतुकही केलं.
 
'महाविकास आघाडीत कोणताही भेदभाव नाही'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. 
 
उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची होती असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
 
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, "मी सभेला पोहचलो तेव्हा तिथे सोफ्याच्या खुर्च्या काही नेत्यांसाठी होत्या. पण मी त्या काढायला सांगितल्या. सर्वांसाठी सारख्या खुर्च्या ठेवल्या. फक्त उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांची खुर्ची वेगळी होती. बसण्याच्या व्यवस्थेत कोणताही भेदभाव झालेला नाही."
महाविकास आघाडीची सभा एकोप्याने पार पडली आणि आमची वज्रमुठ आणखी घट्ट झाली असंही अजित पवार म्हणाले.
 
या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते या मुद्यावरूनही अनेकांनी त्यांच्या अनुपस्थितीवरून प्रश्न केले.
 
यावर बोलताना अजित पवार म्हणाले," प्रत्येक सभेला प्रत्येक नेते उपस्थित राहतीलच असं नाही. नाना पटोले यांची तब्येत बरी नव्हती. प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील असं ठरलं होतं. राहुल गांधी सुरतला जाणार असल्याने काँग्रेसचे नेते आम्हाला सांगून गेले."
 
'उद्धव ठाकरे मविआचा चेहरा असतील कारण...'
संभाजीनगरच्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असल्याचं चित्र स्पष्ट दिसलं.
 
अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असं काहीही ठरलं नसून तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एकसमान स्थान असल्याचं म्हटलं आहे.
 
परंतु सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करणं महाविकास आघाडीसाठी फायद्याचं ठरणार असल्यानेच ही राजकीय रणनीती आहे, असं जाणकार सांगतात. 
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "खरं तर उद्धव ठाकरे हे आधीपासूनच महाविकास आघाडीचा चेहरा आहेतच कारण ते महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते.
 
यामुळे जनतेपर्यंत आतापर्यंत महाविकास आघाडीची जी काही प्रतिमा आहे त्याचं नेतृत्त्व अडीच वर्षं उद्धव ठाकरे यांनीच केलेलं आहे. आता ऐनवेळी समजा उद्धव ठाकरे यांना दुय्यम स्थान दिलं तर जनतेमध्ये वेगळा संदेश जाऊ शकतो. या कारणामुळेच महाविकास आघाडीच्या सभांमध्ये उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट केलं जात आहे."
 
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात भाजपच्या नेत्यांनी सातत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच शिवसेनेतील बंड उद्धव ठाकरे यांच्यामुळेच केला गेला असे आरोप शिवसेनेच्याच आमदारांनी केले.
 
उद्धव ठाकरे यांनी घरी बसूनच अडीच वर्ष राज्याचा कारभार चालवला अशीही टीका त्यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आली. पण ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्याचं ठरवलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतही महाविकास आघाडी कायम राहीली. नुकत्याच पार पडेलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळालं.
 
"आता अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना बाजूला केलं किंवा इतर कोणत्या नेत्याला केंद्रस्थानी नेमलं तर जनतेमध्ये संदेश जाऊ शकतो की उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप महाविकास आघाडीलाही मान्य आहेत.
 
महाविकास आघाडीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. आता त्यांना समजा संभाजीनगरच्या सभेत मुख्यस्थानी प्रोजेक्ट केलं असतं तर उद्धव ठाकरे यांना डावललं अशा बातम्या झाल्या असत्या. यामुळेच 2024 च्या निवडणुकांपर्यंत तरी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा राहतील हे स्पष्ट आहे," असंही संदीप प्रधान सांगतात.
 
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाजूने सहानुभूती असल्याचं चित्र आहे.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शिवसेनेत फूट पडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभी राहिली. फूट पडल्यानंतर आणि त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी सत्तेत आपलाच मुख्यमंत्री असून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने सध्या उद्धव ठाकरे यांना जनतेत सहानुभूती आहे. यामुळे महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे असल्यास त्यांना हे अधिक फायद्याचं आहे."
 
हेच मत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांचंही आहे. ते सांगतात, "ज्यांना भाजप-शिवसेना युतीला मतदान करायचं नाही असा एक मतदार वर्ग नव्याने तयार होत आहे. हा मतदार महाविकास आघाडीचा आहे असं आपण म्हणू शकतो. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली सहानुभूती एनकॅश करण्याचा किंवा मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा महाविकास आघाडीचा आहे. या सहानुभूतीचं रुपांतर मतांमध्ये करण्याचं आव्हान महाविकास आघाडी समोर आहे."

मविआची 'ही' रणनीती असू शकते
औरंगाबादचं नामांतर होऊन आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडून  याची प्रक्रिया पूर्ण केली आणि आता प्रशासकीय कामाकाजात नामांतराची अंमलबजावणी करण्यात आली. 
 
संभाजीनगर हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून संभाजीनगर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तसंच नामांतरानंतर संभाजीनगरमध्ये वातावरण संवेदनशील असून राजकारणही तापलं आहे. या कारणांमुळेही संभाजीनगरच्या सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला महाविकास आघाडीत विशेष महत्त्व दिलं गेलं, असंही राजकीय विश्लेषक सांगतात. 
 
संदीप प्रधान सांगतात, "संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचा मतदार अधिक आहे. संभाजीनगरमध्ये सध्या असलेलं राजकीय वातावरण पाहता तिथल्या सभेत जनतेला उद्धव ठाकरे काय भाषण करतात याला राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व होतं. तसंच महाविकास आघाडी आजही एकजूट आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहचणं सुद्धा त्यांच्यादृष्टीने गरजेचं होतं. आता शरद पवार संभाजीनगरच्या सभेत उपस्थित असते तर त्यांचंच भाषण सर्वात शेवटी झालं असतं कारण ते महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत."

यापुढे महाविकास आघाडीच्या सभा विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात होणार आहेत. यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे केंद्रस्थानी राहतील, असं महाविकास आघाडीच्या सभांचं स्वरुप असण्याची शक्यता आहे.
 
महाविकास आघाडीची पुढील सभा ही 16 एप्रिल रोजी नागपूर येथे होणार आहे. या सभेची जबाबदारी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याकडे दिली आहे. आता संभाजीनगरच्या सभेप्रमाणेच नागपूरच्या सभेतही उद्धव ठाकरे केंद्रस्थानी दिसणार का, हे सुद्धा पहावं लागेल.
 
अभय देशपांडे सांगतात, "ज्या भागात ज्या पक्षाचं वर्चस्व आहे तिथे संबंधित पक्षाचे नेते आघाडीवर दिसतील. आता नागपूरच्या सभेची जबाबदारी काँग्रेसकडे आहे. कारण तिथे शिवसेनेचे स्थान नगण्य आहे. यामुळे तिथे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं मोठी होतील. उद्या कोल्हापूरमध्ये सभा झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर दिसेल. यामुळे तिथल्या जनतेमध्ये कोणाचं वर्चस्व अधिक आहे, कोणता पक्ष अधिक प्रभाव पाडू शकतो यानुसार सभा होतील."
 
याचा अर्थ महाविकास आघाडी सर्वच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढेल, असंही चित्र नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समिकरणांनुसारच निर्णय घेतले जातात. परंतु आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे.

Published By- Priya Dixit