शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (15:38 IST)

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केले आहे. 
 
बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले असून आता राज्यात उद्धव सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.
 
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. मात्र १७० पेक्षा अधिक आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील असा दावा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला होता. मंत्रिपदाची शपथ ही सभागृहातील घटना नाही, याचा अधिकार राज्यपालांना, मंत्रिमंडळाला हंगामी अध्यक्ष बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो. राज्यपालांनी केलेली निवड यामुळे सभागृह चालविण्याचा अधिकार मला प्राप्त झाला आहे  असे मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर सगळे नियम, कामकाज धाब्यावर बसवून सभागृहाचं कामकाज सुरु आहे, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह सुरु आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
देशाच्या इतिहासात कधीही हंगामी अध्यक्ष अधिवेशन सुरु असताना बदलला नाही, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याशिवाय आजतागायत विश्वासदर्शक ठराव मांडला गेला नाही अशी विधानसभेची प्रथा-परंपरा आहे, बहुमत असताना का निवडणूक घेतली नाही? असे मत देवेंद्र  फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.