मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (08:42 IST)

आजपासून दोन दिवस महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन, सरकारचा विश्वास दर्शक ठराव

नवीन मंत्री महोदयांचा परिचय आणि मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 02.00 वाजता विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभेच्या सर्व सदस्यांनी विधानभवन, मुंबई येथे विधानसभेच्या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता विधानसभा सभागृहात घेण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत कक्ष क्र.021, तळ मजला, विधानभवन, मुंबई येथे सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा, विधान भवन, मुंबई यांच्याकडे पोहोचतील, अशा बेताने पाठविण्यात यावेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी त्याचदिवशी दुपारी 12.00 वाजता करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत असेल. नामनिर्देशनपत्र आणि उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाच्या प्रती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या 'अ' कक्ष, अकरावा मजला, विधानभवन, मुंबई येथे उपलब्ध असून या निवडणुकीचा कार्यक्रम, नोटीस, नामनिर्देशनपत्र, उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाचा नमूना इत्यादी सर्व कागदपत्रे विधानसभा सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर या प्रती महाराष्ट्र विधीमंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे श्री.भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.