रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (16:32 IST)

मतदानाद्वारे गाव ठरवणार गावाचा पक्षी, १० पक्षी उमेदवार

गावाचा पक्षी ठरवण्यासाठी चक्क गावात मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीस १० पक्षी उभे राहिले असून, जो पक्षी जास्त मते मिळवेल तो गावाचा पक्षी म्हणून ओळखला जाईल व त्याची विशेष काळजी गावातील नागरिक घेणार आहेत. यवतमाळ :- विदर्भातील दुसरी व महाराष्ट्रातील तिसरी ठरणाऱ्या उमरखेड तालूका पक्षी निवडणुकीचा प्रारंभ दि. 30 जुलै 2018 पासून होत आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवात विकास, उमरखेड अंतर्गत या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले असून निवडणूक रिंगणात 10 पक्षी उमेदवार आहेत. निवडणूक ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने घेतली जाणार आहे. उमरखेड तालुक्याचापक्षी निश्चित करण्यासाठी दहा पक्ष्यामधून निवडून आलेल्या पक्ष्याला तालुका पक्षी घोषित केले जाणार आहे. उमरखेड तालुकापक्षी निवडणूक ही महाराष्ट्रातील तिसरी व विदर्भातील दुसरीच निवडणूक ठरणार आहे. उमरखेड तालुक्यातील लोकांना पक्षी जीवनाची ओळख व्हावी तालुक्याची पक्षीप्रेमी व पर्यावरण स्नेही ही ओळख व्हावी या उद्देशाने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या निवडणुकीकरिता उमरखेड तालुक्यातील परिसरात आढळणारे पोपट, वेडा राघू, काळा किंकर, बुलबुल, जांभळा सुर्यपक्षी, खंड्या, धनचिडी, सुगरण, तांबट ,कोतवाल असे दहा पक्षी उमेदवार म्हणून रिंगणात उभे करण्यात आले आहेत. या दहा पक्ष्यांमधून ऑनलाइन पध्दतीने व बॅलेट पेपरद्वारे तालुकापक्षी निवडायचा आहे. त्यासाठी एक गुगल लिंक उपलब्ध करून दिल्या जाईल. या लिंकवर क्लीक केल्यास दहा पक्षी उमेदवारांची नावे असलेली मतपत्रिका उपलब्ध होईल. त्यातील दहा पैकी एका पक्ष्याला मतदान करून स्वतः चे नाव व गाव लिहून ही मतपत्रिका पुन्हा सबमिट करावयाची आहे. याशिवाय तालूक्यातील काही ठिकाणी तसेच शाळांमध्ये मतदान केंद्र (बूथ) राहतील तेथे छापील मतपत्रिका द्वारे मतदान करता येईल. तसेच एक फिरत्या मतदान केंद्राचाही वापर या काळात करण्यात येईल. निवडणूक कालावधी दि. 30 जुलै 2018 ते 7 ऑगस्ट 2018 राहणार असुन सर्व वयोगटातील तालूकावासीयांना मतदान करता येईल. 15 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
 
मतदान जनजागृती तसेच शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी तसेच युवकांपर्यंत पोहचण्याकरीता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास, उमरखेड प्रयत्न करणार आहे.तरी उमरखेड तालूक्यातील सर्व पक्षीप्रेमींनी या नाविण्यपूर्ण उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन नैसर्गिक पर्यावरण संवर्धनचे पुर्व विभाग अध्यक्ष दिपक ठाकरे, तालूकाध्यक्ष गजानन चौधरी, उपाध्यक्ष जमिर खतिब,सचिव प्रभाकर दिघेवार, फराहत मिर्झा, माधव चौधरी, प्रमोद वाळूककर, शे.शफी,गजानन हसतबांधे, इब्राहीम सौदागर इत्यादी कार्यकर्त्यांनी केले आहे.