1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:23 IST)

अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड

मुंबई, कोल्हापूरनंतर आता धुळे-नंदुरबार विधान परिषदही बिनविरोध निघाली आहे. भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्या चर्चेनंतर साटंलोटं झालं. मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात भाजपनं काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली आहे. धुळे-नंदुरबारमधून काँग्रेस उमेदवार गौरव वाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बिनविरोध निवड झाल्यानंतर अमरिश पटेल यांच्या समर्थांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. वाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र स्वीकारलं. त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी अमरिश पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, या निवडीबद्दल अमरिष पटेल यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 
तिकडे कोल्हापुरात भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर बोलताना राज्य पातळीवरील नेत्यांनी सामंजस्य दाखवलं आणि चर्चा केली त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीतील विरोध वैयक्तिक पातळीवर नसावा ही आमची भूमिका असल्याचं सतेज पाटील म्हणाले. 
दुसरीकडे मुंबईतून भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. मात्र, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानं मुंबईत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कोपरकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदेही विधान परिषदेवर बिनविरोध जाणार आहेत.
भाजपकडून नागपूरची जागाही बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी अडेलतट्टू भूमिका घेतल्यामुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.