शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (16:07 IST)

अवकाळी पाऊस: 'हुरड्याचा दररोज 50 क्विंटल माल निघायचा, तिथं आज 5 किलोही निघणार नाही'

rain
रविवारच्या (26 नोव्हेंबर) मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातल्या बहुतांश भागाला बसला आहे. या पावसामुळे शेतीपिकांचं नुकसान झालं आहे.
 
हवामान विभागानं पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
 
राज्यातल्या बहुतांश भागात सध्याही ढगाळ वातावरण आहे.
 
दरम्यान, रविवारच्या (26 नोव्हेंबर) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात ज्वारी, हरभरा, तूर, कापूस या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
 
नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांचं गणित बिघडलं
रविवारी (26 नोव्हेंबर) दुपारी चार-साडेचार नंतर निफाड, लासलगाव, नैताळे, देवपूर, पचकेश्वर, रानवड, नांदुर्डी, रेडगाव, पालखेड मिरची परिसरात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला.
 
निफाड तालुक्याच्या इतरही भागात गारपिटीनं मोठं नुकसान झालं आहे. बऱ्याच ठिकाणी गारांनी द्राक्षांचे घड गळून पडले.
 
गारांच्या तडाख्यानं काही भागात द्राक्ष पिकांचं 100 टक्के नुकसान झालं आहे. द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान होऊन आर्थिक गणित बिघडलं आहे.
 
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना आज (27 नोव्हेंबर) सकाळीच नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली आहे.
 
ते म्हणाले, “द्राक्ष, ऊस, कांदा, भाजीपाला अशा अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. माझं जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या शेतपिकांचे पंचनामे ताबडतोबीनं करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्याही कानावर आम्ही ही परिस्थिती घालणार आहोत.”
 
"आज सुट्टी असली तरी महसूल व कृषी विभागामार्फत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात येणार . दोन ते तीन दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणार," असंही ते म्हणालेत.
 
अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला अवकाळी पावसानं तडाखा दिली आहे.
 
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
 
मराठवाड्यात पिके भुईसपाट
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी रात्रभर प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीवरील माती वाहून गेली आहे.
 
अतिपावसामुळे शेतातील कापसाची बोंडं खाली गळून पडली आहेत. वेचणीला आलेला कापसाची पावसामुळे दाणादाण उडाली आहे.
 
रबी हंगामातील ज्वारी, गहू पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हुरडा ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं.
 
पण रविवार रात्रीच्या पावसामुळे ज्वारीची कणसं मातीत मिसळली आहेत.
 
“हुरड्याचा दररोज 50 क्विंटल माल जिथं निघायचा, तिथं आज 5 किलोही निघणार नाही, पावसानं ज्वारीचं पूर्ण नुकसान केलंय,” नरसापूरचे हुरडा उत्पादक शेतकरी अण्णा शिंदे सांगत होते.
 
नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळाली आहे. शहरातल्या अनेक भागांतील रस्त्यावर पाणी साचलं आहे.
 
परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कापूस पिक भिजलं असून तूर, ज्वारी, हरभरा, भाजीपाला ही पिकं भूईसपाट झाली आहेत.
 
परभणीतल्या करपरा नदीला आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी जिंतुर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये शिरलं आहे.
 
विदर्भात पिकांचं आणि पशुधनाचंही नुकसान
अकोल्यातल्या अकोला, पातूर तालुक्यात पावसाणुळे तूर, हरभरा या पिकांचं नुकसान झालं आहे.
 
यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
मेंढपाळ शालिकराम तुकाराम बिचकुले बुलडाणा जिल्ह्यातल्या लाखनवाडा गावात राहतात. ते सध्या मेंढ्या घेऊन अकोला जिल्ह्यातील टाकळी इथं मुक्कामी आहेत.
 
रविवारी रात्रीच्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्यांच्याकडील 20 मेंढ्या दगावल्या असून 5 गंभीर जखमी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
बुलडाण्यात रविवार रात्रीपासून अद्यापर्यंतही पाऊस सुरू आहे. पावसाच्या तडाख्यामुळे तूर, कापूस, संत्रा, ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
 
पावसाच्या तडाख्यामुळे ऊसाचं पिक अक्षरश: आडवं झालं आहे.
 
विरोधकांचा सरकारवर निशाणा
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलंय की, “नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
 
“कोरड्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नव्हती. स्वतःच्या हिमतीवर स्वतःला सावरून पुन्हा उभं होत असताना काल अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे पुन्हा कंबरडे मोडले आहे.
 
“नाशिक मधील द्राक्ष बागायतदार, कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्गमध्ये आंब्यांचे नुकसान झाले आहे.
 
“लागोपाठ सुरू असलेल्या दुष्काळी चक्रामुळे शेतकऱ्याला तातडीने सरकारी मदतीशिवाय आता कोणता पर्याय नाही. त्यामुळे सरकारने गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकर शेतकऱ्यांना मदत करावी.”
 
सध्या सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कधी कोसळतील ते काही कळत नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
गोरेगाव येथे एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अवकाळी पावसाबाबत असं वक्तव्य केलंय.
 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय की,
 
“राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या गारपिटीमुळे वाया गेली आहेत.
 
"सरकारच्या आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी वर्गाचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यात या गारपिटीचा मारा शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल करणारा आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.”
 
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्येही पावसाची शक्यता आहे.
 
दरम्यान, देशातील विविध भागात सोमवारी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामाना विभागाने वर्तवला आहे.