शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (22:13 IST)

तोपर्यंत मनसे-भाजप युती शक्य नाही : दानवे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांच्या मुद्द्याबाबत बदल करत नाही, तोपर्यंत मनसे-भाजप युती शक्य नाही  असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ते नाशिकमध्ये बोलत होते. सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियाच्या धंद्यात आहेत. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने स्पष्ट कौल दिला. मात्र, राज्यात दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार आले. या राज्यातली जनता सरकारवर नाराज असल्याने, 2024 मध्ये भाजप स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करेल असा दावा त्यांनी केला. 
 
राज्यात उसळलेल्या हिंसाचारावर बोलताना दानवे म्हणाले, अतिक्रमण काढावे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. त्रिपुरामध्ये मशिद पडली. मात्र, त्याचे पडसाद मालेगाव, अमरावतीमध्ये कसे, त्यांच्या मागे एखादी शक्ती आहे. खरे तर संजय राऊत यांचा आढावा घ्यायचा असेल, वेगळी प्रेस घ्यावी लागेल. सुधीर मुनगंटीवार यांची क्लिप आपण बघितली, पण उद्धव ठाकरे यांची देखील क्लिप बघा. ते म्हणतात, आमच्या राज्यात एकही संप होणार नाही. अन्यथा आमचा मंत्री जाऊन समाधान काढेल असे ते म्हाणाले.
 
रेल्वेचे खासगीकरण होणार नाही, अशी हमी देताना ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे कुटुंब शासनाच्या दारात बसून मागण्या मागत आहेत. मात्र, सरकारकडून समाधानकारक चर्चा नाही. तांत्रिक बाबी तपासाव्यात. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना मिळाव्यात. धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती दिल्या. तसंच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सवलती द्याव्या, असा सल्ला त्यांनी दिला.