सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (21:21 IST)

उरण : ‘आई तुझं देऊळ’ फेम सचिन ठाकूर यांची कार अज्ञातांनी पेटवली! photo

उरण : ‘आई तुझं देऊळ’ या गाजलेल्या गीतातील नृत्य कलाकार, नृत्य दिग्दर्शक उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपूत्र, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सचिन लहू ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञाताने पेटवली आहे. जानेवारी महिन्यातही त्यांची कार जाळण्यात आली होती. सात महिन्यांनंतर ही घटना पुन्हा घडल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, याप्रकरणी अज्ञाताविरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.
 
5 जानेवारी 2023 रोजी जसखार येथील घराजवळ उभी असलेली कार अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली होते. त्यावेळी या वाहनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. सचिन ठाकूर यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला होता. मात्र त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले होते.
 
आता सात महिन्यांनंतर या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. 7 ऑगस्ट रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मागच्या वेळी ज्या पद्धतीने कार जाळण्यात आली होती, त्याच पद्धतीने पुन्हा कार जाळण्यात आली आहे. सचिन ठाकूर यांची कार दुसर्‍यांदा जाळण्यात आल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
ही आग सचिन ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्रांनी लगेच विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र दुसर्‍यांदा गाडी जाळल्याने या घटनेमागे एकच व्यक्ती असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, वाहन जाळणार्‍या व्यक्तीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी सचिन ठाकूर यांनी केली आहे.
 
घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. सदर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच विविध पुराव्यांच्या सहाय्याने आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सदर घटनेचा तपास शीघ्र गतीने आम्ही करीत आहोत.
- बबन सोनावणे,
पोलीस उपनिरीक्षक,
न्हावा शेवा पोलीस स्टेशन
 


Edited By - Ratnadeep Ranshoor