बच्चू कडू यांनी अमरावती येथे ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली
प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आणि मजुरांच्या विविध प्रश्नांवरून बच्चू कडू यांनी अमरावती येथे जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. अमरावती येथे केलेल्या भाषणातून बच्चू कडू यांनी मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात साप सोडण्याचा इशारा दिला आहे. मजुरांच्या प्रश्नांवर पुढील १५ दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांवर भाषण करताना बच्चू कडू म्हणाले, “गावातल्या मजुरांसाठी एकही योजना नाही. शेतकऱ्याला साप चावला तर त्यांच्यासाठी विमा आहे. पण मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाहीत. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्यास होकार दर्शवला. पण मंत्र्यालयातील कृषी सचिव ढवळे याला आडवा येत आहे.”
“त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी सचिवाला इशारा देतोय की, त्यांनी पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही. सापाला काही जात, धर्म किंवा पंथ नसतो. एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतात राब-राब राबणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे” असंही बच्चू कडू म्हणाले.
Edited By - Ratnadeep Ranshoor