शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (15:27 IST)

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे तातडीने भरणार

राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची १ हजार २४०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची १ हजार ५३६ रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
 
मंत्रालयातील दालनात शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, उपसचिव रोहिणी भालेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व मुख्य अभियंता व सर्व अधिक्षक अभियंता दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
 
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. कमी मनुष्यबळात काम करणे कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तत्काळ पदभरती होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.
 
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती घ्यावी. बढतीची देखील कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र बदलीचे आदेश निघूनही काही अभियंता नियुक्त ठिकाणी हजर झालेले नाहीत. बदलीचे कार्यादेश मिळूनही विहित कालावधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी या बैठकीत दिले.