रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (10:02 IST)

खासदार भावना गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात शाब्दिक वाद

वाशीम यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामधील राजकीय वैर तसा जुनाच आहे. त्यात पुन्हा खासदार गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर हा वाद विकोपाला गेला. दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार पाटणी यांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. यानंतर आमदार पाटणी यांनी वाशीम पोलिसात खासदार गवळी यांनी धमकी दिल्याची तक्रार दिली आहे.
 
वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी आढावा बैठकीत उपस्थित राहणार होते. त्यापूर्वीच शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला अडथळे का आणता असे म्हणत खासदार गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आमने-सामने आले. त्यांच्यात चांगलीच ‘तू तू मै मै’ झाली. या दरम्यान शिवागाळही झाली.
 
यावर आमदार पाटणी यांना विचारले असता ते म्हणाले की, मी कुठलाच वाद घातला नाही’ अशी प्रतिक्रिया दिली. तर सेना खासदार भावना गवळी यांना झालेल्या प्रकारावर विचारले असता ‘नंतर बोलेन असे सांगून’ बोलण्याचे टाळले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप-सेनेचे कार्यकर्ते जमा झाल्याने वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. या प्रकारानंतर भाजपच्या वतीने शहर बंदचे आवाहन केले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.