महिलांनी सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा का? रहाटकर यांचा सवाल
राज्यात बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या. पण या निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकारप्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे? असा संतप्त सवाल भाजप नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला. विजया रहाटकर यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी महिला अत्याचारावरून राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या सरकारने दोन वर्षे महिला सुरक्षेसंदर्भात केवळ महिलांची घोर निराशा आणि फसवणूक केली. ज्या शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने घरी पाठवले, त्या छत्रपतींचा दाखला वेळोवेळी देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यच रोजच महिलांचा अवमान करताना दिसत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्कालिन गृहमंत्र्यांनी 2019 च्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याच्या घोषणा केल्या. तो कायदा अजूनही लागू झालेला नाही, असं सांगतानाच महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत रहाण्याचा अधिकारच नाही, असा घणाघात रहाटकर यांनी केला.