भीमा-कोरेगाव प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद: विखे पाटील
भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
एकबोटे यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, भीमा-कोरेगावची दंगल राज्य पुरस्कृत दंगल होती, असा आरोप आम्ही सातत्याने करीत आलो आहेत. मिलिंद एकबोटेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईतून आमचा आरोप स्पष्ट झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात पोलीस सांगतात की, एकबोटे आम्हाला मिळून येत नाहीत. एकबोटे सांगतात की,पोलिसांनी मला बोलावलेच नाही. यातून सर्व प्रकरण स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज प्रलंबित असताना एकबोटे मिळत नाहीत, असे सांगणाऱ्या पोलिसांना जामीन अर्ज नामंजूर झाल्याबरोबर एकबोटेचा पत्ता कसा मिळतो? असाही प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.