मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 23 जुलै 2022 (08:13 IST)

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमधून दररोज शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

eknath shinde
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले सत्तांतर नाट्य आणि शिवसेनेमधील पडलेल्या उभ्या विभाजनानंतर मूळ शिवसेनेत असलेले अनेक आमदार, खासदार, जिल्हा व तालुका प्रतिनिधी नगरसेवक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. भिवंडीत असेच घडले आहे.
 
विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमधून दररोज एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अनेक नवे आणि जुने शिवसेना कार्यकर्ते येत असून अनेक पदाधिकारी देखील त्यांच्याच गटात सामील होत आहेत. साहजिकच मूळ शिवसेना पक्षाची चिंता वाढली आहे. काल देखील असाच प्रकार घडला शिवसेना शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून त्यावर अनेक ठिकाणी मेळावा होत आहेत. आदित्य ठाकरे यांचा भिवंडीत सकाळी मेळावा झाला. त्यानंतर सायंकाळी अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिंदे यांची सायंकाळीच भेट घेतली.
 
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाचा पाठिंबा मिळाला होता. या आमदारांच्या पाठिंब्यावरच एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता विविध शहरांच्या महापालिकेतील नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आता भिवंडीतही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भिवंडी महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
 
याबाबत माहिती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. ‘ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दिला, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.
 
भिवंडीमधील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाल्याने भिवंडीमध्ये शिवसेनेत मोठे खिंडार निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गुरुवारी सकाळी आदित्य ठाकरे यांचा भिवंडीत मेळावा पार पडला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. मात्र त्यानंतर काल रात्रीच भिवंडीमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
 
त्यापूर्वी ठाणे महापालिकेत एक माजी नगरसेवक सोडता सर्वच माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तीच स्थिती नवी मुंबईमध्ये देखील आहे. नवी मुंबईमधील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच रायगड जिल्ह्यासह कोकणामधील आजी, माजी नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होत असल्याने शिवसेनेला लागलेली ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे आता खरे निष्ठावान कोण आणि कोण फुटीरता बंडखोर याबाबत सर्वसामान्य सैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.