गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (15:36 IST)

लाज उरली असेल ,हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा!-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरें

aditya thackeray
चाळीस गद्दारांवर एवढा विश्‍वास ठेवला की, त्यांना मिठी दिली आणि त्यांनी त्यांच्या हातातील खंजीर पाठीत खुपसला. यांना पक्षामुळे मंत्री, पदे, नेतेपद, महामंडळ दिली. यांची भूक भागत नसल्याने पक्षासोबत गद्दारी केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांनुसार चालणारे असल्याचे सांगतात. अन दुसरीकडे त्यांच्याच सुपूत्रास मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचता. शिवसेनेने तुम्हाला ओळ्ख दिली. थोडी लाज उरली असेल आणि हिम्मत असेल तर राजीनामा द्या अन निवडणुकीला सामोरे जा. अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर केली.
 
शिवसेनेच्या वतीने मनोहर गार्डन येथे शिवसेना पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाउसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, विलास शिंदे आदींसह सेना पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. खासदार हेमंत गोडसे यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी या खासदारास पर्यावरण व पर्यटन विभागाकडून भरघोस निधी दिला. 2014 साली पावसामध्ये दीड तास त्यांच्यासाठी प्रचार केला. तरीसुध्दा यांनी गद्दारी केली. ज्या लोकांना ओळख दिली त्यांनीच घात केलाचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर नागरिकांच्या डोळ्यात अश्रू कधी पाहिले नाही. मात्र पक्षप्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर कितीतरी नागरिकांच्या डोळ्यात पाणी प्रत्यक्षात पाहिले. निष्ठावान शिवसैनिक हीच शिवसेनेची ओळ्ख आहे. यापूर्वी या गद्दारांनी काय केले माहिती नाही. मात्र आम्ही जेव्हापासून विधानभवनात आलो. तेव्हापासूनच यांची पोटदुखी सुरु झाली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर यांना राक्षसी आनंद झाला. आम्ही महाराष्ट्रात अभिमानाने फिरू शकतो. गद्दार आमच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. गद्दार आमदार व खासदारांमध्ये दोन गट असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. हे शिवसैनिक नव्हतेच ते उठाव केल्याचे सांगतात मात्र ही गद्दारीच आहे.आसाममध्ये एकीकडे पूर असताना हे गद्दार हॉटेलमध्ये होते. पुरामुळे तेथील लोकांचे जीव जातांना पाहिले. यांना त्याचे काही देणे घेणे नाही.
 
ठाकरे येताच दहा मिनिटे घोषणाबाजी
आदित्य ठाकरे येण्यापूर्वीच मेळाव्याचे स्थान शिवसैनिकांनी भरले होते. त्यांची एन्ट्री होताच उत्साहात स्वागत करण्यात आले. घोषणाबाजी, शिट्या आदीमुळे वातावरणात जोश होता. ठाकरे उभे राहिल्यानंतर प्रारंभीचे पाच ते दहा मिनिटे घोषणाबाजीच सुरू होती. अख़ेर ठाकरे यांना शिवसैनिकांना मला पंधरा मिनिटे बोलू द्या अशी मागणी करावी लागली. तसेच हा जोश आपल्याला विधानसभा, लोकसभेसाठी ठेवायचा असल्याचे उपस्थित सैनिकांना सांगितले.
 
सरकार घटनाबाह्य
राज्यात अतिवृष्टी झाली असून शेतकर्‍यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. तसेच हे सरकारच घटनाबाह्य आहे. सध्या देशाच्या राजकारणात पक्षांमध्ये गट पाडून राज्य ताब्यात घेतली जात आहे. यामुळे येत्या दिवसात देशाची स्थिती अस्थिर होण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.
 
शिंदे विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी
मोठया संख्येने शिवसनिक मेळाव्याचे ठिकाणी जमा झाले होते. सुरवातीपासून जोरदार घोषणाबी सुरु होती. आदित्य ठाकरे येताच घोषणाजी अधिक प्रमाणात वाढली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात संतप्त शिवसैनिक वादग्रस्त घोषणाबाजी करु लागले. याकडे ठाकरे यांचे लक्ष जाताच त्यांनी शिवसनिकांना अशी घोेषणाबाजी करणार्‍यांना थांबविले.