गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (22:41 IST)

आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला, 'अनेक जण मी पुन्हा येईन म्हणतात, भिंतीवरही लिहितात पण...'

"अनेकांना वर्षा सोडता येत नाही, मी पुन्हा येईन म्हणतात, भिंतीवरही लिहितात. पण उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सहज सोडला," अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
 
शिवसेनेच्या कालिना-कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
 
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर सडेतोड शब्दांत टीका केली. "घाण होती ती गेली, आता फक्त चांगलंच होणार," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
 
ते पुढे म्हणाले, "माझं नाव आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य, जिथे प्रकाश नाही तिथे प्रकाश पाडू."
 
 
"बंडखोर आमदारांना मुंबईत यावं लागणार आहे. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. त्यांच्या दोन फ्लोअर टेस्ट होतील. एक आतमध्ये आणि दुसरी बाहेर," असंही ठाकरे म्हणाले.
 
शिवसेनेला वाचवण्यासाठी हा लढा समर्पित - एकनाथ शिंदे
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या विळख्यातून शिवसेनेला वाचवण्यासाठी हा लढा समर्पित आहे, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंआहे.
 
शिवसैनिकांना आवाहन करताना ते म्हणाले, "नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित."
 
एकनाथ शिंदेंमुळे आम्ही शांत आहोत - श्रीकांत शिंदे
"एकनाथ शिंदेंचं घर 24 तास शिवसैनिकांसाठी खुलं होतं. इथे कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही. इथे सर्व जमले कारण शिंदे सुख दु:खात त्यांच्यासोबत असतात. एकनाथ शिंदेंमुळेच आम्ही सध्या शांत आहोत," असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज दुपारी केलं.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केलं.
 
गेल्या अडीच वर्षांत सत्ता असूनही पक्ष खाली गेला. निधी मिळत नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांची नसून आमदारांची ही तक्रार आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
 
'आम्ही अजूनही शिवसेनेतच, गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार' - दीपक केसरकर
आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. भारतीय जनता पक्ष अथवा इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेतच राहून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे, असं वक्तव्य बंडखोर शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे.
 
आज गुवाहाटी येथे आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमच्याबाबत विविध प्रकारचे गैरसमज पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे आमची भूमिका पसरवण्यासाठी मी बोलण्यासाठी आलो आहे, असं केसरकर म्हणाले.
 
एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव कायदेशीर नाही, असं केसरकर यांनी म्हटलं.
 
गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरण्याचा अधिकार नाही - संजय राऊत
आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बैठकीत ठरलेल्या पाच प्रस्तावांबाबत माहिती दिली.
 
यापुढेही पक्षाचे सर्व अधिकार हे उध्दव ठाकरेंकडेच असतील. ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केली म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश उध्दव ठाकरेंनी दिले आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही. तुम्हाला जर मतं मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा. शिवसेनेच्या बापाच्या नावाने नाही."
 
तसंच शिवसेना आगामी सर्व निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे, असंही राऊत यांनी म्हटलं.
 
मुंबई शहरात कलम 144 लागू, 10 जुलैपर्यंत जमावबंदी
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या विरोधात मोर्चे काढत आहे. तर त्याचवेळी त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांच्या विरोधात आंदोलन होत आहेत. अनेक ठिकाणी आमदार कार्यालयावर हल्ले होत आहेत.
 
दरम्यान, काही ठिकाणी पोस्टरबाजी आणि बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ मोर्चांचाही प्रकार दिसून आला. या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
 
राजकीय सत्तासंघर्षात जिल्हा आणि शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या आदेशाचे उल्लंघन करण्यात आलेल्या व्यक्तींना पोलिसाकडून अटक होऊ शकते.
 
मुंबई शहरात 10 जुलै पर्यंत जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे.
 
एकनाथ शिंदे गटाचं नाव 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे'
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी त्यांच्या गटासाठी 'शिवसेना- बाळासाहेब ठाकरे' असं नाव पक्कं केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असणारे एक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
 
शिंदे गटाने स्वीकारलेल्या या नावाला शिवसेना आक्षेप घेण्याची शक्यता आहे. लवकरच या नावाच्या अधिकृत घोषणेची शक्यता आहे.
 
हा गट मुंबईत कधी येणार, सत्तास्थापनेसंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना बाळासाहेब असं गटाचं नाव ठेवलं आहे.
 
"बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापना केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं स्वतंत्र अस्तित्व असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे.
 
एकत्र निवडणूक लढवूनही भाजपपासून दूर झालो. तेव्हा भाजपचे कार्यकर्ते दूर झाले का? रस्त्यावर आले का? मोडतोड केली का? पण तरी उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय मान्य केला. पण जेव्हा शिवसेनेचं अस्तित्व संपवायला आपले मित्रपक्ष निघाले तेव्हा गेल्या दीड वर्षापासून आम्ही ही भूमिका मांडली आहे. ती उद्धव ठाकरेंना सातत्याने सांगितली आहे", अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं.
 
शिवसेनेचे वाघ आहात तर मग बकरीसारखं बें बें का करताय?-राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे. बंडखोर आमदारांची संरक्षण व्यवस्था काढल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावर आज आऱोप-प्रत्यारोप, नव्या घडामोडी घडत आहेत.
 
"राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाची असते. महत्त्वाचे निर्णय होतील. पक्षाच्या विस्तारासंदर्भात चर्चा करू. काही नव्या नियुक्त्या करू. शिवसेना मोठा पक्ष आहे. हा पक्ष तयार करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली आहे.
 
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहजपणे कोणी शिवसेनेला हायजॅक करू शकत नाही. आम्ही आमच्या रक्ताने घडवलेला पक्ष आहे.
 
शेकडो लोकांनी बलिदान दिलं आहे. पैशाच्या बळावर कोणी पक्ष विकत घेऊ शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीत या सगळ्यावर चर्चा होईल", असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे सांगायचे, मी शिवसेनाप्रमुख आहे कारण हजारो शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत.
 
शिवसेना हजारो शिवसैनिकांच्या त्यागातून, बलिदानातून उभी राहिली आहे. कुणाला पैशाच्या, दहशतीच्या, अफवांच्या बळावर आपल्या पाठी नेता येणार नाही. पक्ष एकसंध आहे. मजबूत आहे. एकजूट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांची रीघ इथे लागली आहे.
 
सांगली आणि मिरजेचे शिवसैनिक आलेले दिसतील. फक्त आदेशाची वाट पाहत आहेत. हे अन्य कुठल्या पक्षात घडत नाही. हे सोपं नाही.
 
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत. आजची कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम देणारी असेल".
"बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रातून सुरक्षारक्षक नेले आहेत. त्यांना जी सुरक्षा आहे ती आमदार म्हणून आहे. कुटुंबांना सुरक्षा नसते. आमदाराला सुरक्षा असते. महाराष्ट्रात या. आपल्या राज्यात या. असं वणवण भिकाऱ्यासारखे का फिरत आहात? या राज्याची इभ्रत धुळीला मिळतेय. तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात, स्वत:ला वाघ मानता ना, मग बकरीसारखं बें बें करू नका. अजूनही वेळ गेलेली नाही.
 
कालही शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल मातोश्रीवर आले होते. त्यांच्या उपस्थितीत गुवाहाटीहून 10 आमदारांनी आमच्याशी चर्चा केली. राज्यात या, विधिमंडळात या. फ्लोअरवर कोणात किती दम आहे ते सिद्ध होईल. मी जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने बोलतो आहे. हवेत तीर मारत नाहीये. आमची ताकद काय आम्हाला माहिती आहे. ज्यांनी बंड केलं आहे त्यांनी आपले आमदार वाचवावेत", असं राऊत म्हणाले.
 
आता चर्चा नाही- संजय शिरसाट
"उद्धव ठाकरेंनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. इतकं समजावून तर त्यांना असं वाटत असेल तर ते त्यांचं मत आहे. आम्ही काय करणार. आता चर्चा नाही. चर्चेचा विषय संपला आहे", असं एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
"भाजपसोबत अजून कोणतीही बोलणी झालेली नाहीत. उपाध्यक्षांच्या निर्णयाबाबत आम्ही राज्यपालांना पत्र पाठवतोय. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय. तुमची कारवाई चुकीची आहे. पण त्यांचं उत्तर आलेलं नाही", असं त्यांनी सांगितलं.
 
शिरसाट पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी शिंदे साहेबांचं गटनेतेपद काढलं. प्रतोद बदलला. आता कार्यकारिणीची बैठक आहे. याचा अर्थ त्यांना बोलायचं नाही. गट पक्षात विलिन करावा लागेल असं नाही. 2/3 बहुमत आम्ही सिद्ध केलं तर स्वत:च्या पक्षाची स्थापना करू शकतो. आम्ही शिवसेनेचे आहोत. शिवसेना आमचा पक्ष आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही तसं करू शकतो पण आम्ही करणार नाही.
 
आम्हा शिवसैनिक आहेत. दुसऱ्या पक्षाचा विचार केला नाही. गुवाहाटीला गेलो म्हणजे काही भीती आहे असं नाही. सर्वजण एकत्र असावेत यासाठी आहोत. भारतात कुठेही गेलो तरी लोक फॉलो करणार.
 
आम्हाला मुख्यमंत्रिपदाबाबत आक्षेप नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून उतरावं ही आमची कधीच मागणी नव्हती नाहीये. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडा अशी मागणी. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत. ते झाले तर काहीच अडचण नाही.
 
"उद्धव ठाकरेंना अजूनही नेता मानतो. आम्ही संयमाने घेतोय. आम्ही डगमगलेलो नाही. आज दुपारी बैठक आहे. उपाध्यक्षांवर हक्कभंग आणला आहे. त्याबाबत चर्चा झाली. आम्ही नोटीस दिली आहे.
आमदारांशी चर्चा करण्याची ते धडपड करतायत. त्यांना करूद्यात. आम्ही पक्ष वाढवायला निघालोय. बुडवायला नाही", असं शिरसाट म्हणाले.
 
भाजप अस्पृश्य होता तेव्हा आम्ही साथ दिली- मुख्यमंत्री
"भाजप अस्पृश्य होता तेव्हा आम्ही त्यांना साथ दिली. कोणीही त्यांच्याबरोबर जायला तयार नव्हतं तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. हिंदू मतांचं विभाजन होऊ नये यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही आता याचा परिणाम भोगत आहोत", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते.
 
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडामुळे राज्यात निर्माण झालेल्या सत्ता संकटासंदर्भात तोडगा काढण्यासाठी शिवसेनेनं आज दुपारी एक वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, "आम्ही अशा लोकांना तिकीट दिलं जे जिंकून येणार नव्हते. आम्ही त्यांना तिकीट देऊन जिंकवलं. पण आता आमच्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. दुसरीकडे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे.
 
बंडखोर आमदार भाजपबरोबर जाण्याबाबत बोलत आहेत. ज्या पक्षाने आमचा पक्ष आणि कुटुंबाला बदनाम केलं त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही".
 
शेरास सव्वाशेर भेटतो असं सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना तलवारीसारखी आहे. म्यानात ठेवली तर त्याला गंज चढतो. जर बाहेर काढली तर ती तळपते, चमकते. आता ही तलवार चमकवण्याची वेळ आली आहे.
 
जे आमदार बंडात सहभागी होऊ इच्छितात ते जाऊ शकतात. पण जाण्याआधी आमच्याकडे या, बोला मग जा. ज्यांनी आम्हाला सोडलं त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यावाचून गत्यंतर नाही.
 
"काही दिवसांपूर्वी काही गोष्टींबाबत मला संशय आला म्हणून मी एकनाथ शिंदे यांना फोन करून म्हटलं की पक्ष पुढे नेण्याचं कार्य सुरू ठेवा. जे आता सुरू आहे ते योग्य नाही. ते मला म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारांचं म्हणणं आहे की आपण भाजपबरोबर जावं. तुम्हाला मी अयोग्य अथवा अकार्यक्षम वाटत असेल तर मला तसं सांगा. मी पक्ष सोडायला तयार आहे. आतापर्यंत तुम्ही माझा सन्मान केला आहे कारण बाळासाहेबांनी तसं करायला सांगितलं होतं.