सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (07:50 IST)

जिह्यातील एक लाख 17 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Jayant Patil
सांगली :पाण्यापासून वंचित असलेल्या गावांसाठी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे तीन हजार 558 कोटीच्या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. जिह्यातील दोनशेवर गावांतील सुमारे एक लाख 17 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. आगामी दीड ते दोन वर्षात ही कामे मार्गी लागणार असून यानंतर जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, शिवाय जिल्हाही टँकरमुक्त होणार असल्याची माहिती जिह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
 
जलसंपदा विभागाने जिह्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना आगामी दोन ते तीन वर्षात पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही याचे नियोजन केले असल्याची माहिती सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जत तालुक्यातील 64 गावे म्हैसाळ योजनेतून वंचित आहेत. या गावांसाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले असून याबाबतचा अहवाल अंतिम टप्यात आहे. या योजनेमुळे या गावातील 40 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहेत. टेंभू उपसा योजनेतून खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, माण आणि खटाव तालुक्यातील 109 गावे वंचित होती. सुधारित योजनेसाठी आठ टीएमसी उपलब्ध केले आहे. यामुळे 50 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून यासाठी सुमारे 1200 कोटी खर्चाला मान्यता दिली आहे.
 
टेंभू विस्तारित योजनेमुळे जिह्यातील सर्व ठिकाणी पाणी पोहोचणार असून एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. ताकारी, म्हैसाळ जुन्या सिंचनाचे ओपन कॅनॉल बंदिस्त पाईपा लाईनद्वारे करण्याचे ठरविण्यात आले असून कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि कडेगाव तालुक्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून 180 कोटी इतका खर्च होणार आहे. आरग-बेडग उपसा सिंचन योजनेतून परिसरात असणाऱया गावांतील 1100 हेक्टर पाण्याखाली येणार आहे. यासाठी मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी आग्रह धरला होता. 20 कोटींच्या कामाला तत्वता मान्यता दिली आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
 
ताकारी-दह्यारी योजनेतून वाळवा तालुक्यातील वंचित भवानीनगर, येडेमच्छिंद्र, लवंडमाची, कि. म.गड आदी गावातील 650 हेक्टर क्षेत्रासाठी पाणी देण्यात येणार असून या योजनेच्या कामाला शासन मान्यता देण्यात आली आहे. कृष्णा कॅनॉल लाईनिंग करण्याच्या 86 किमी कामाला तत्वता मान्यता देण्यात आली आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. वाकुर्डे योजना टप्पा दोनसाठी 3.35 टीएमसी पाणी उपलब्ध झाले असून यामुळे 15 हजार 760 हेक्टर क्षेत्राला पाणी येणार आहे. याशिवाय वाळवा तालुक्यातील 20 गावांना पाणी देण्याची निविदा महिन्याभरात निघणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. वारणा धरण दुरूस्ती, गळती रोखण्याची गरज असून यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव तयार केला असून याला प्रशाकीय मान्यता महिन्याभरात मिळणार आहे.