शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (22:43 IST)

राज ठाकरे - 'सर्व हिंदूंना डांबता येईल एवढी कारागृह देशात नाहीत'

Raj Thackeray
राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून उद्यापासून म्हणजेच 4 मेपासून मशिदींच्या भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा लावा, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलंय.
 
भोग्यांचा त्रास काय असतो हे त्यांनासुद्धा समजू द्या असं, राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय.
 
भोग्यांविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्याचं आवाहनसुद्धा राज ठाकरे यांनी केलं आहे, तसंच अजान सुरू झाल्यावर 100 नंबरवर फोन करून तक्रार नोंदवा, असं या पत्रकात त्यांनी म्हटलंय.
 
महत्त्वाचं म्हणजे ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले आहे त्याचं स्वागत करत तिथं कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय.
उद्धव ठाकरे यांना उद्देशून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं 'सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे' हे ऐकणार आहात की बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं? असा सवाल त्यांनी केला आहे.
 
तसंच देशात एवढी कारागृह नाहीत की सर्व हिंदूंना त्यात डांबणं शक्य होईल, असं शेवटी राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.
 
"आम्हाला पक्षकडून जे आदेश आले आहेत त्यावर आम्ही काम करणार," असं मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी या पत्रकाच्या प्रसिद्धीनंतर म्हटलंय. "आम्ही कुठल्याही नोटीसीला घाबरत नाही. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करणारच," असं त्या पुढे मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
 
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
औरंगाबादमधल्या सभेत कायदा मोडल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
"औरंगाबाद मधील सभेप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह राजीव जावळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा सिटी चौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 116,117,153,135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनसमुदायासमोर चिथावणीखोर भाषण करणे, तसंच सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणारे भाषण करणे, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे," औरंगाबाद मधील सिटी चौक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
 
राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे लावण्याच्या बाबतीत 4 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावायला सुरुवात केली आहे. शहरात काही अनुचित प्रकार धडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं या नोटीशीत म्हटलं आहे.
 
मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आज दुपारी पोलिसांनी घरी जात नोटीस बजावली आहे. पोलिसांची ही दडपशाही मनसे सहन करणार नाही, असं खांबेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले आहेत.
 
तर सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
 
"आम्ही अशा केसेसला घाबरत नाही. आम्ही 16 वर्षं असा संघर्ष करत आहोत. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या नोटीसा देण्यात आल्या आहेत. आम्ही आंदोलन करणारच," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.
 
राज्यात आतापर्यंत13 हजारांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आलीये. राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत भोंग्यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या नोटीसा दिल्या आहेत.
 
राज्यात बाहेरून गुंड आणण्याचे प्रयत्न- राऊत
"राज्यात शांतता आहे. बाहेरून राज्यात, मुंबईत गुंड आणून गोंधळ करायचा अशी माहिती आहे. ज्यांची ताकद नाहीये अशी माणसं. हे सुपारीचं राजकारण. सुपाऱ्या राज्यात चालणार नाहीत. राज्यातले पोलीस सक्षम आहेत. मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. फार चिंता करण्याचं कारण नाही", असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

"अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. नवीन काही नाही. आमच्यावरही असे गुन्हे दाखल झाले होते. आमच्या लिखाणावर, वक्तव्यावर झाले आहेत. एखादी व्यक्ती कायद्याचं उल्लंघन करत असेल, मग ती व्यक्ती कितीही मोठी असेल, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. प्रक्षोभक भाषण देणं, अग्रलेख यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल आहेत," असंही राऊत पुढे राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत म्हणालेत.
 
ते पुढे म्हणाले, "सरकारची भूमिका सरकार ठरवेल. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव होते. त्या बैठकीला मी होतो. राज्यातल्या यंत्रणा सक्षम आहेत. महाराष्ट्राविरुद्ध कट आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न आहे. स्वत:ची ताकद नसल्याने बाहेरून गुंड आणून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न आहे. अल्टिमेटमचं राजकारण इथे चालणार नाही."
 
राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही?
राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे, तर राज ठाकरेंवर का नाही, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
 
राज ठाकरेंवर सौम्य कलमं लावण्यात आली आहेत. राज ठाकरेंचं विधान हे जातीधर्मांत तेढ निर्माण करणारं होतं, पण त्यांना जामीन मिळेल अशारितीने त्यांच्याविरोधात कलमं लावली गेली, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
 
राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
1 मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं, "4 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी."
 
"जर सरळ सांगून समजत नसेल तर कठोर पावलं उचलावीच लागतील," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
 
राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी अजान सुरू झाली. त्यांमी म्हटलं की, सभा सुरू असतानाच लाऊडस्पीकरवरून बांग ऐकू येत आहे. पोलिसांनी हे भोंगे तत्काळ थांबवावेत असं राज ठाकरे म्हणाले.
 
जर सरळ सांगून कळत नसेल तर एकदाच जे व्हायचं ते होऊ द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं.