सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 एप्रिल 2023 (12:57 IST)

जळगावात पाणी टंचाई; 4 तालुक्यात टँकर सेवा सुरू

जळगाव : जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा 43 अंशावर गेला असून, पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्यासाठी टँकरची मागणी होत असून, जिल्ह्यातील चार तालुक्यात सहा टँकर सुरू करण्यात आले आहेत. तर 12 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
 
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढता आहे. सोमवारी भुसावळचे तापमान 43.3 अंश इतके राज्यातील सर्वात जास्त नोंदवले गेले. तर जळगाव शहराचे 41 अंश नोंदवले गेले. मे मध्ये जिह्याचे तापमान हे 46 अंशापर्यंत नोंदवले जाते. यंदा देखील मे महिना सुरू होण्यापूर्वीच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यात या वाढत्या तापमानाने पाणी टंचाई जाणवू लागली असून, जिल्हा प्रशासनाकडे पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी टँकरची मागणी नोंदवण्यास सुरवात झाली आहे.
 
सध्या चार तालुक्यात पाणी टंचाई जाणवत असून, पाणी टंचाई निवारणार्थ सहा टँकर सुरू करण्यात आले आहेत. यात जामनेर तालुक्यात दोन, पारोळा तालुक्यात दोन व बोदवड आणि भडगाव येथे प्रत्येकी एक एक टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जामनेर तालुक्यात आठ, पारोळा तालुक्यात दोन तर भुसावळ भडगाव तालुक्यात प्रत्येकी एक अशा बारा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील लोणवाडी व चाळीसगाव तालुक्यातील हातगाव भिल्ल वस्तीत एक अया दोन तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor