सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 मे 2023 (09:08 IST)

शनिवारी, रविवारी लोअर परेल, वरळी दादर, धारावीचा पाणीपुरवठा बंद

जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील माहिम, माटुंगा, दादर, प्रभादेवी, लोअर परळ, सात रस्ता, डिलाई रोड, धोबी घाट इत्यादी परिसरात 27 मे रोजी सकाळी 8 ते 28 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ 26 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे माहिम, माटुंगा, दादर, प्रभादेवी, लोअर परळमध्ये पाणी बंद असल्यामुळे दादर परिसरातील शिवसेना भवन व सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना बसणार आहे.
 
मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दादर (पश्चिम) मधील सेनापती बापट मार्ग व काकासाहेब गाडगीळ मार्ग यांच्या जंक्शनवर अस्तित्वात असलेल्या 1,450 मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. अंतर्गत गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे 27 मे रोजी सकाळी 8 वाजता जलवाहिणी दुरुस्तीच्या कामाला सुरूवात होणार आहे, तर 28 मे रोजी सकाळी 10 वाजता सदर काम पूर्ण होईल. परिणामी सदर ठिकाणी पाणी कपात करून नेमकी गळती शोधून पॅच वर्क किंवा रिबेट बदलून दुरूस्ती पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या गळती शोधण्यासाठी प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याची माहिती जल अभियंता विभागाने दिली आहे. सबब, दुरुस्तीच्या प्रत्यक्ष या कालावधीत जी-दक्षिण व जी-उत्तर विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
 
या विभागात पाणीपुरवठा बंद
1. जी/उत्तर विभाग – संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात २७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
2. जी/ दक्षिण विभाग – डिलाई रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस.एस. अमृतवार या परिसरात २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
3. जी/दक्षिण विभाग – ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात २८ मे रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor