रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मार्च 2023 (22:00 IST)

एकनाथ शिंदेंना तर आम्ही बळजबरी घोड्यावर बसवलं – संजय शिरसाट

eknath shinde sanjay sirsat
प्राजक्ता पोळ
facebook
 उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्या आमदारांचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेना भरीस पाडल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना त्यांची काळजी व्यक्त केलीय, तसंच त्यांना सल्लासुद्धा दिला आहे.
 
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलंय. तसंच संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेला त्यांनी स्थानिक खासदार इम्तियाज जलिल यांना जबाबदार ठरवलं आहे.
 
संभाजीनगरमध्ये निर्माण झालेली स्थिती कशामुळे निर्माण झाली आहे, त्याची कारण काय आहेत असं तुम्हाला वाटतं?
संजय शिरसाट - औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याची पोटदुखी काही लोकांमध्ये आहे. त्यामध्ये आपला पक्ष कसा वाचेल, आपलं राजकारण कसं वाचेल यासाठी इम्तियाज जलिल यांनी आंदोलन केलं. त्यात त्यांनी भडकाऊ भाषणं केली. त्याचा परिणाम काही अंशी मुस्लिम समाजातील तरुणांवर झाला. ही ठरवून केलेली दंगल आहे.
 
पण इम्तियाज जलिल यांनी मंदिरात असल्याचा एक व्हीडिओ पोस्ट केलाय. त्याबाबत त्यांनी आवाहनसुद्धा केलं आहे.
संजय शिरसाट - मला मुस्लिम-हिंदूंमध्ये तेढ निर्माण करायचा आहे, असं समजू नका. एवढ्या गडबडीमध्ये आपण व्हीडिओ कसा काय पाठवू शकतो. हा सर्व दिखावा आहे, हे नाटक आहे.
 
मुख्यमंत्र्यांशी याबाबत काही चर्चा झाली आहे का?
संजय शिरसाट - आताच माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. जे यामागे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तातडीनं झाली पाहिजे अशी मी त्यांच्याकडे मागणी केली आहे.
 
सुषमा अंधारेंबाबात तुमच्याकडून चुकीचं वक्तव्य झालंय असं तुम्हाला नाही का वाटत?
संजय शिरसाट - राजकारणात नवीन आलेला माणूस स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही तरी स्टंट करत असतो. तशीच खटपट सुषमा अंधारे करत आहेत. महिलांनी आपल्या मर्यादेत बोलावं. राजकीय भाषण करा ना. तुम्हाला कुणी मनाई केली आहे. पण तुम्हाला इतरांच्या खासगी जीवनावर टीका टिप्पणी करायची असेल तर त्याचं प्रत्युत्तर कुणी ना कुणी देईल ना?
 
महिलांनी मर्यादेत बोलावं म्हणजे नेमकं काय?
संजय शिरसाट - ज्या विचित्र टीका-टिप्पणी या करतात ना, विचित्र हावभाव करतात. आता उदाहरण म्हणून सांगतो, माझ्या आणि तिच्या वयात किती फरक आहे. ती भाषणात मला कसं म्हणते – ‘तो संज्या.’ काहीतरी भान ठेव ना बाबा. दुसऱ्यांनाही वाईट वाटतं.
 
तुम्ही तुमच्यावर संस्कार करून घ्या ना. एक आपली लिमिट असली पाहिजे. त्या लिमिटमध्ये तुम्ही कुणावरही टीका करा, काही हरकत नाही. पण, दुसऱ्यावर तुम्ही टीका करायची आणि तुम्हाला कुणी जराशी जरी चिमटी घेतली की महिलांवर अन्याय, महिलांचा अपमान केला, असं परसवणाऱ्या 2-3 महिला राजकारणात आहेत.
 
जसा त्यांनी टीका झाल्यावर कायद्याचा आधार घेतला. तसा तुम्ही घेऊ शकत नाहीत का. तुम्ही सत्तेत आहात. अशा प्रकारे प्रत्युत्तर दिल्यावर सरकारची बदनामी होते, असं नाही का वाटत?
संजय शिरसाट - काही लोकांना अशी भाषा कळते. मी काही वाईट बोललेलो नाही. मी कोणत्याही खालच्या थराला जाऊ टीका केलेली नाही. पण त्यांना टोचेल असंच मी बोलेलो आहे. मी वाईट बोललो आहे हे सिद्ध तर करा ना. मी तर त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन. उगाच स्टेटमेंट करायचं आहे म्हणून करत नाहीये. केस केली तर बोलतील की पाहा आता यांच्याकडे लढायला ताकद नाही राहीली म्हणून केस केली. दोन्ही बाजूने आम्हाला वाजवायचं का? म्हणून पुरुषांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही.
 
तुमचेच एक आमदार आहेत अब्दुल सत्तार यांनी सुप्रीया सुळे यांच्याबाबत वाईट शब्द वापरला होता. या पातळीला राजकारण का जातंय?
संजय शिरसाट - अब्दुल सत्तारांनी माफी मागितली, सुप्रीयाताईंनी त्यांना माफ केलं, हा विषय तिथंच संपतो.
 
त्यांचं बोलणं चूक आहे, त्याचं कुणी समर्थन केलेलं नाही. मी जे बोललो, मी वारंवार सर्वांना सांगतो, त्यामध्ये एक वाक्य असं दाखवा की ज्यात अश्लिल शब्दप्रयोग आहे. चुकीचं काही बोललोय तर मी गुन्हेगार आहे. मी माफी मागेन. मी जाऊन पायावर पडेल. पण मी बोललो नसताना तुम्ही माझी बदनामी करणार असाल तर मी सोडणार नाही. एवढं निश्चित आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणालेत राज्यात दगड राज्य करत आहेत. त्यावर तुमचं काय प्रत्युत्तर आहे?
संजय शिरसाट - आम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन टाकलेले दगड जर तरंगत असतील तर त्याचा आनंद त्यांना झाला पाहिजे. आणि त्यावर पाय देण्याची वेळ आता तुमच्यावर येणार नाही. तुम्ही बोलत असताना तुमच्या बाजुला उभ्या असलेल्या दगडांना विचारा की तुम्ही ही शिवसेना कुठे घेऊन चालला आहात? तुम्ही ज्यांना दगड म्हणत आहात ते आता शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे चाललेल आहेत. तुम्ही या दगडांवर डोकं आपटू नका, दगडावर डोकं आपटल्यावर स्वतःचंच डोकं फुटतं. दगडाचं डोकं नसतं फुटत तुमचं डोकं फुटेल. यांची काळजी घ्या. एवढाच माझा त्यांना सल्ला असेल.
 
महाविकास आघाडीची पहिली सभा संभाजीनगरमध्ये होणार आहे. 2 एप्रिलला तुमच्याच जिल्ह्यातून त्याला सुरुवात होत आहे...
संजय शिरसाट - एप्रिल फूल बनवण्यासाठी ती सभा होत आहे. एक जण हिंदुत्वावर बोलणार एक जण सर्वधर्म समभावावर बोलणार आणि एकजण टोमणे देण्यात धन्यता मानणार. तुम्ही अडिच वर्षांमध्ये काय केलं ते लोकांना सांगा. जर तम्ही टोमणे मारण्यासाठी सभा घेत असाल. गद्दार, खोके हे तर तुम्ही घरात बसूनही बोलू शकता. कशाला लोकांना वेठीस धरतात.
 
मंत्री तानाजी सावंत बोलले आहेत की सत्तांतर होण्याआधी दीडशे बैठका झाल्या होत्या आणि त्याला ते उपस्थित होते. तुम्ही किती बैठकांना उपस्थित होते?
संजय शिरसाट - त्यांचं स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमातूनच ऐकलं आहे. प्रत्येक आमदार काँग्रेस- राष्ट्रवादीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. आम्हाला ही युती नको असं सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर ते कुणाला भेटले असतील, चर्चा केली असेल तर त्यांची मला माहिती नाही.
 
मी अशा कुठल्या बैठकांना उपस्थित नव्हतो. असतं तर सांगितलं असतंच.
 
नंतरच्या काही महत्त्वाच्या बैठकींना मात्र मी उपस्थित होतो.
 
सत्तांतर होण्याच्या किती महिने आधी बैठकांचं सत्र सुरू होतं?
संजय शिरसाट - ज्या दिवशी महाविकास आघाडी निर्माण झाली त्या दिवसापासून सर्वच आमदारांमध्ये खदखद होती. त्याचा परिणाम सत्ता आल्यानंतर 2-3 महिन्यांनंतर सर्वच आमदारांचा आक्रोश वाढायला लागला. त्यानंतर मग शिंदे साहेबांकडे सर्व जायला लागले. त्यांना बळजबरी करायला लागले. तुम्ही आता पुढे जाऊन सांगा, असं होऊ लागलं. कारण ते आमचे गटनेते होते. हे सर्वं झाल्यानंतर त्याचा परिणाम आता तुम्हाला दिसत आहे.
 
सुरुवातीपासून सर्व आमदार तुमच्या सोबत होते?
संजय शिरसाट - सर्व नाही. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत होते. माझ्या मतदारंघात मला आलेला अनुभव वेगळा होता. मला मातोश्रीवर देण्यात आलेली वागणूक वेगळी होती.
 
मला मंत्रालयात राष्ट्रवादी नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी दिलेली वागणूक या सगळ्याची जेव्हा खिचडी पकायला सुरूवात झाली, त्यावेळी मग मी पहिला पुढे आलो. नंतर एक एक करत सर्व आमदार आले. यांना कुणी निमंत्रण दिलं नव्हतं. सर्व त्यांचा असंतोष दाखवण्यासाठी पुढे आले. मग नेता कोण अस पाहिजे? अनेकदा दोनतीन बैठकींमध्ये आम्ही उद्धवसाहेबांना सुद्धा बोललो. पण ते ऐकत नव्हते. मग आम्ही पर्याय असा काढला की शिंदे साहेबांना म्हटलं की, तुम्ही नेतृत्व करा. त्यांना सांगा. उद्धव साहेबांना, तरी ते ऐकायला तयार नव्हते. राष्ट्रवादीबद्द्लचं त्यांचं प्रेम जास्त होतं. शिवसैनिक आज आहे काय आणि उद्या नाही राहीला तरी काय? काय फरक पडतो? पण राष्ट्रवादी जर गेली तर आपलं कसं काय होईल ही कदाचित त्यांना भीती असावी. म्हणून त्यांनी काय लक्ष दिलं नाही. गेले तर जातील 10-15. एवढे जातील अशी त्यांची अपेक्षासदुधा नव्हती.
 
सत्तांतर झाल्यावर उद्धव ठाकरेंची परत घेण्याची तयारी होती? असं म्हटलं जातं की त्यांनी फोन केला होता की, परत या आपण भाजपसोबत सत्ता स्थापन करूया...
संजय शिरसाट - नाही ज्या दिवश आम्ही उठाव केला, त्याची जेव्हा त्यांना जाणीव झाली ही हे सर्व आता माझ्या हातातून चाललेलं आहे. त्यावेळी त्यांनी निश्चित आम्हा सर्वांना फोन केले होते. जवळपास 20-25 फोन मला आले असतील. परंतू भाजपबरोबर जाऊ असं मात्र ते कधी म्हणाले नाहीत. कदाचित त्यांनी भूमिका बदलली असती तर त्याचा आनंद आम्हालापण झाला असता.
 
हे फोन कशासाठी होते?
संजय शिरसाट - परत येण्यासाठी होते. परत या तुमच्या अडचणी मी सोडवतो, म्हणजे काय पुन्हा जसं चालू आहे तसं चालू द्या.
 
म्हणून मग तुम्ही एकनाथ शिंदेंना नेता निवडलं?
संजय शिरसाट - म्हणून आम्ही एकनाथ शिंदेना नेता निवडलं. त्यांच्या काही मनात नव्हतं. आम्ही तर त्यांना बळजबरी घोड्यावर बसवलं आहे.
 
पण उद्धव ठाकरे ऐकण्याच्या मनस्थितत का नव्हते?
संजय शिरसाट - त्यांना वाटलं की हे फक्त 8-10 लोक आहेत. ते जरा जास्त हुशारच आहेत. जास्त शहाणेच आहेत. एकदा यांना कळू दे. म्हणजे 8-10 लोक स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतील, बाजुला जातील. आपण काही न करता जर ते बाजुला जात असतील तर तो आनंदच आहे.
 
तसंच त्यांच्या बाजुचे चमचेसुद्धा त्यांना तेच सांगायचे. साहेब जास्त नाही 8-10 लोक आहेत ते गेले तरी आपल्यावर काही परिणाम होत नाही, आपण सत्तेच राहू....
 
त्यांचं गणित चुकलं पण तुमचं गणित कसं असणार आहे? भाजप तुम्हा खूप कमी जागा निवडणुकीत देण्याची शक्यता आहे. तशी चर्चा त्यांच्या गोटात आहे.
 
नाही, असं नसतं. राजकारणात काही गोष्टी या तडजोडीसह पुढे घेऊन जायच्या असतात. ज्यांच्याकडे बहुमत नव्हतं तेसुद्धा या देशात पंतप्रधान झालेले आहेत. म्हणून भाजप कधीही चूक करणार नाही. त्यांना दाखवायचं आहे की आमच्याबरोबर असलेल्यांची आम्ही पाठराखण करू. दोघांना एकमेकांची गरज आहे म्हणून आम्ही मजबुतीने लढू.
 
आता आघाडीत सर्वांना माहिती आहे की आपण एकमेकांना सोडलं तर मरणारच आहोत. त्यांना ते स्पष्ट दिसतंय, पण आमचं मात्र तसं नाही. जेव्हा एखादा उठाव होते तेव्हा वरिष्ठ पातळीवर याची चर्चा होते. वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेतून भविष्यात काय करायचं आहे याची रुपरेषासुद्धा ठरलेली आहे. प्लॅन त्याचा ठरलेला आहे.
Published By -Smita Joshi