शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (17:52 IST)

मुंबई भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब! पृथ्वीराज चव्हाण यांचा टोमणा

pruthviraj chouhan
गेल्या 10 दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाटकाचा अंत झाला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड पुकारला होता. शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता धोक्यात आली आणि बऱ्याच उलटफेरानंतर अखेर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला. त्यांनतर भाजपचे देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असेच सर्वांना वाटले होते. पण अखेर काल पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले आणि आपण मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले. 
 
एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारल्यानंतर आज भाजपकडून मुंबईच्या कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. या विजय समारोहात मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अनुपस्थित होते. त्यावरून काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस याना टोमणा दिला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा पण नवरदेव मात्र गायब.     
 
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे तसेच मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी फडणवीस यांना विनंती करत मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणीस यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी दोनदा फोन केल्याचे बोलण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणीस मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होत असल्याचे सांगितले.
 
एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनाचे जाहीर केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यावर भाजपच्या मुंबईतील कार्यालयात विजयी जल्लोष समारोह करण्यात आला. पण या समारोहात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपनेते सत्तास्थापनेसाठी इतर बैठकी असल्यामुळे उपस्थित नसल्याचं सांगण्यात येत आहे. या वरून पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे नेते उपस्थित नसल्यामुळे टोमणा मारला आहे.