शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (08:57 IST)

अचलपूरमध्ये कशावरून झाला वाद?

mumbai police
अमरावती जिल्ह्यातील अचलपुर शहरात दुल्हा गेटवर भगवा झेंडा फडकावल्याच्या वादावरून दोन गटात राडा झाला. दोन गटातला वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळं शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
 
17 एप्रिलला (रविवारी) रात्री सुमारास ही घटना घडली.
 
इथे दोन समुदाय आमने सामने आल्यामुळे अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे उप-अधीक्षक शशिकांत सातव यांनी सांगितले.
 
अचलपूर शहरात प्रवेश करण्यासाठी चार गेट आहेत. त्यापैकी दुल्हा गेटवर लागलेल्या झेंड्यावरून वाद झाला. हा झेंडा कोणत्या रंगाचा होता हे पोलीस सांगायला तयार नाहीत. पण प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की हा झेंडा भगव्या रंगाचा होता, याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
 
घटनास्थळी शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दरम्यान या प्रकरणी अचलपूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
याबद्दल अधिक माहिती देताना जिल्ह्याचे उप-अधिक्षक शशिकांत सातव म्हणाले, "या प्रकरणी अचलपूर पोलीस स्टेशनला तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे आणि त्यामुळे इथली परिस्थिती शांत आहे. अचलपूर तसंच परतवाडा शहरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे."त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलं आहे.
 
ज्या दरवाज्यावर अनधिकृतपणे झेंडा लावण्यात आला तो दरवाजा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतो असं अमरावती रेंजचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सांगितलं. परिस्थिती पाहूनच तसंच गुन्हेगारांना अटक झाल्यानंतरच संचारबंदी हटवण्याचा किंवा शिथिल करण्याचा निर्णय घेता येईल असंही ते म्हणाले.
 
पोलिसांनी भाजपच्या 25 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अमरावतीचे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांना अचलपूर शहरात येण्यासाठी बंदी घातली.
 
याप्रकरणी बोलताना निवेदित चौधरी म्हणाल्या की, "आम्हाला इथल्या मुलांच्या पालकांचे फोन आले म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो. इथे तणावाचं वातावरण आहे, पण पोलीस आम्हाला जाऊ देत नाहीत."
 
अमरावतीत याआधीही नोव्हेंबर 2021 मध्ये धार्मिक तणाव वाढण्याच्या घटना घडल्या होत्या.
 
12 नोव्हेंबर 2021 मध्ये अमरावतीत हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर तिथे 5 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.
 
पठाण चौक, इतवारा बाजार, चित्रा चौक अशा अतिसंवेदनशील भागांत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.