शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (17:13 IST)

राज मुंगसे- उमेश खाडेने रॅपमध्ये असं काय म्हटलं ज्यामुळे गुन्हा दाखल झाला?

social media
सोशल मिडीयावर रॅप साँग करणाऱ्या दोन तरुणांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने सध्या या दोघांची चर्चा होतेय. राज मुंगसे आणि उमेश खाडे असं या तरुणांची नावं आहेत.राज मुंगसे हा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असून त्याने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर ‘चोर आले, पन्नास खोके घेऊन चोर आले’ हे रॅप साँग प्रसारित केलं.
 
तर मुंबईतील वडाळ्याचा रहिवासी असलेला उमेश खाडे याने त्याच्या सोशल मिडीया प्लॅटफॅर्मवरुन गरिबीवर भाष्य करणारे ‘भोंगळी केली जनता’ हे रॅप साँग पब्लिश केलं.
 
या रॅप साँगमुळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघंही नेमके कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.
 
‘भोंगळी केली जनता’ हे रॅप साँग बनवणारा उमेश खाडे
28 वर्षांचा उमेश मुंबईतील वडाळा भागातल्या एका झोपडपट्टीत राहतो. आई-वडील आणि लहान भाऊ असा त्याचा परिवार आहे.
 
उमेशचं बीकाँम पर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्याचे वडील खाजगी गाड्यांवर ड्रायवर म्हणून काम करतात. एका खोलीच्या घरात हे कुटुंब वडाळ्यात राहतं.
 
उमेश गेल्या पाच-सहा वर्षांपासून यूट्यूबवर ‘शंभो रॅप’ नावाचं चॅनेल चालवतो. 9 ऑगस्ट 2017 रोजी त्याने हे चॅनेल काढलं, असं त्याच्या यूट्यूबवर पेजवर दिसतं.
 
त्याच्या युट्यूब चॅनेलवर एकूण 28 व्हीडिओ आहेत आणि 3 लाख 75 हजार सबस्क्राईबर्स आहेत. या सगळ्या व्हीडिओंना मिळून 35 लाखांच्यावर व्ह्यूज आहेत.
 
उमेशने बॅंकेची नोकरी सोडून पूर्णवेळ युट्यूबर म्हणून काम करायचं ठरवलं अशी माहिती त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने दिली.
 
उमेश खाडेच्या यूट्यूब चॅनेलवर मराठीमधले वेगवेगळ्या विषयांवरचे रॅप साँग आहेत. त्यातील काही गाण्यांना लाखांच्या घरात व्ह्यूज आहेत.
 
उमेशच्या गाण्यावरुन आत्ता वाद का झाला?
शंभो रॅप या पेजवर महिन्याभरापूर्वी ‘भोंगळी केली जनता’ या नावाचं रॅप साँग अपलोड झालेलं दिसतं. गाण्याचे शब्द आणि एक्टींग उमेशची आहे.
 
या गाण्यात कुण्याही एका राजकीय पक्षाचा उल्लेख नाही. पण राजकारणात जनेतेची काय अवस्था झाली आहे, या विषयावर या गाण्यातून भाष्य केलेलं आहे.
 
'सतराशेसाठ पक्ष असून जनतेकडे लक्ष नाही' असा या गाण्यात उल्लेख आहे. तसंच या रॅप साँगमध्ये काही शिवराळ शब्दांचा वापर केलेला आहे.
 
गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, उपासमार अशा समस्यांचा उल्लेख या गाण्यात येतो. तसंच यामधून सगळ्याच राजकारण्यांवर निशाणा साधल्याचंही दिसतं.
 
पण याच गाण्यामुळे उमेश विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 7 एप्रिल 2023 रोजी पोलिसांनी उमेश विरोधात एफआयर दाखल केला.
 
जाणीवपूर्वक शांततेचा भंग करणे, समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे विधानं करणे, अश्लिल माहीती प्रसारित करणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 7 एप्रिलला केलेल्या एका ट्वीटमुळे हे प्रकरण चर्चेत आलं.
 
जितेंद्र आव्हाड यांनी 7 एप्रिलला ट्वीट करुन म्हटलं की, “भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं आहे.
 
या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा.”
 
काही मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी उमेशला अटक केल्याचा आरोप फेटाळला आहे. त्याला चौकशीसाठी बोलावून सोडून देण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं.
 
उमेशला नोटीस देण्यात आली असून जेव्हा गरज असेल चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी पोलिसांवर टीका केली.
 
“असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसीराज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का… मी कायम तुमच्या बरोबर आहे. आपला गळा दाबत आहे. तुकाराम जेल मध्येच बसले असते यांनी तर नामदेव ढसाळ यांना आयुष्याभर जेल मध्ये बसवलं असतं विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे,” असं त्यांनी ट्वीटकरुन म्हटलं आहे.
 
‘पन्नास खोके घेऊन चोर आले’ रॅप साँग बनवणारा राज मुंगसे
राज मुंगसे हा छत्रपती संभाजीनगर जवळच्या तीसगावचा रहिवासी आहे.
 
भीमराज प्राँडक्शन नावाने त्याचं युट्युबवर अकाउंट आहे. त्यावरच त्याने पन्नास खोके घेऊन चोर आले हे गाणं साधारणपणे दोन आठवड्यांच्या आधी अपलोड केलेलं दिसतं.
त्याच्या यूट्यूब चॅनेलला साडेसहा हजार सबस्क्राईबर्स आहेत. तर एकूण 294 व्हीडिओ अपलोड केलेले आहेत. सगळे व्हीडिओ मिळून अकरा लाखांच्यावर व्ह्यूज गेलेले आहेत.
 
या यूट्यूब चॅनेलच्या माहितीमध्येच संविधान संघर्ष समिती असं लिहिलं आहे आणि कव्हर पेजवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे.
 
राज मुंगसे याचे स्वत:चे व्हीडिओ ब्लॉग्स या चॅनेलवर दिसतात. यामध्ये राजने काही व्हीडिओमधून जातीयवादाविरोधात भूमिका घेतलेली दिसते. काही व्हीडिओंमध्ये त्याने म्हटलेल्या विद्रोही कविता आहेत. काही सभांमधल्या भाषणांचे व्हीडिओ आहेत.
 
आत्ता काय झालं?
राज मुंगसेच्या चॅनेलवर ‘पन्नास खोके घेऊन चोर आले’ हे रॅप साँग साधारणपणे दोन आठवड्यांच्या आधी प्रसिद्ध झालं. त्याचं सादरीकरण राज मुंगसे करताना दिसतोय.
 
या गाण्यात कुण्या एका राजकारण्याचं नाव घेतलेलं नाही. पण पन्नास खोके या आरोपावरुन राज्यात पेटलेलं राजकारण, सुरत मार्गे गुवाहाटीला जाण्याचा उल्लेख, पक्षाचं नाव चोरल्याचा आरोप या सगळ्या गोष्टींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर या गाण्यामधून निशाणा साधल्याचा अंदाज येतो.
 
हे गाण युट्यूबवर प्रसारित झाल्यावर राज मुंगसे विरोधात मुंबईजवळच्या अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर राज मुंगसे याच्या संभाजीनगर मधल्या घरी पोलीस आल्याचं राज मुंगसे याचा भाऊ सोमेश मुंगसे याने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
यानंतर राज मुंगसे बेपत्ता झाला. तो कुठे होता यासंदर्भात त्याच्या कुटुंबाला माहीती नव्हती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे की, तो अजून कुठे आहे हे स्पष्ट होत नव्हतं.
 
त्यानंतर 12 एप्रील 2023 रोजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज मुंगसे त्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं. तसंच त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्याचं ते म्हणाले.
 
न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राज मुंगसे याने माध्यमांशी संवाद साधला. आपल्याला अटक झाली नव्हती आणि अंडरग्राउंड असल्याचं त्यानं सांगितलं.
 
“मी नाॅर्मली लिहीत असतो. त्यावर मी रॅप केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर अंबरनाथमधून एका महिलेने माझ्यावर तक्रार दाखल केली. त्या रॅपमध्ये मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं.
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने आपण ते बोलू शकतो. पण मला कळलं नाही पोलिसांनी ती एफआयआर का घेतली. मला अटक झालीच नाही. संभाजीनगरमधून पोलिसांचा आधी कॉल आला होता. ते म्हणत होते की तो व्हीडिओ डिलिट कर. माफीचा व्हीडिओ टाक. पण मला माहीती होतं की मी काहीही चुकीचं बोलेलो नाहीये. मला व्हीडिओ डिलीट करायचा नव्हता."
 
"म्हणून मी तिथून निघून गेलो. मी एफआयआर दाखल झाली तेव्हा दानवेंना संपर्क केला. त्यांनी मला वकिलांचा नंबर दिला. नंतर मी अंडरग्राऊंड झालो. माझ्या घरच्यांनाही माहिती नव्हतं मी कुठे आहे. ते हळवे आहेत. जर त्यांना कळलं तर असतं तर त्यांनी आजूबाजूला सांगितलं असतं.
 
माझा विश्वास नाही शेजारी कुठे काही जाऊन बोलेल. अटकपूर्व जामीनासाठी अप्लाय करायचं होतं. पण मध्ये तीन दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे मला लपून राहावं लागलं,” असं राज मुंगसे याने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
 
रॅपरच्या गुन्ह्यांमुळे विरोधकांची टीका
उमेश खाडे आणि राज मुंगसे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने विरोधकांनी सरकारवर आणि पोलिसांवर टीका केली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन सांगितलं की ते रॅपर्सचा एक कार्यक्रम घेणार आहेत.
 
“मी सगळ्या #Rappers ला एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम … आपल्या भाषेत व्यक्त होणे हे बाबासाहेबांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे… विद्रोह हा बुद्धा पासून तुकारामापर्यंत सगळयांनी केला शीव, शंभु, फुले, आंबेडकरांनीही विद्रोह केला आणि समाजाला दिशा दिली,” असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
 
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही राज्य सरकावर निशाणा साधला.
 
“मा. न्यायालयाने Interim Protection (Not to Arrest) रॅपर राज मुंगसे यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्यात सरकारच्या विरोधात बोलण म्हणजे गुन्हा आहे. युवकांवर, कलाकारांना गुन्हा दाखल होऊन तरूणांचे भविष्य हे सरकार उध्दस्त करत आहे, आम्ही यांच्या पाठीशी सर्व ताककदीनिशी उभे असू,” असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
 
Published By- Priya Dixit