शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (19:47 IST)

SSC Result बाबत वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

मुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही दोन तासापासून प्रयत्न करतोय पण साईटवर एरर येत आहे. साईट क्रॅश झाली आहे असा संदेश दिसतोय. आम्ही साईट कधी सुरू होईल याची वाट पाहतोय."
 
एसएससी बोर्डाच्या या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार होता परंतु वेबसाईटवर प्रचंड लोड आल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नाहीय.
बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "हा तांत्रिक बिघाड अचानक समोर आला आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही वेळात वेबसाईट सुरू होईल."
 
दहावीची यंदाची एकूण विद्यार्थी संख्या 16 लाख 58 हजार 624 इतकी आहे. लाखो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट उघडल्याने वेबसाईट क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
'निकाल जाहीर करण्याची घाई का केली?'
शालेय शिक्षण विभागाने दहावीचा निकाल जाहीर करण्याची घाई केल्याने आणि विभागाअंतर्गत असमन्वय असल्यानेच विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला अशी टीका आता केली जात आहे.
 
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ते संजय डावरे म्हणाले, "शिक्षणमंत्री आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यानेच साईट क्रॅश झाल्याचे दिसते. अनेक तासांपासून विद्यार्थी ताटकळत बसले असून निकालाच्या प्रतिक्षेत आहेत."
तसंच सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय झालेला असताना 758 विद्यार्थी नापास कसे दाखवण्यात आले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
बोर्डाच्या अपुऱ्या तयारीमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप झाल्याची टीका भाजप शिक्षक आघाडीने केली आहे.
 
संघटनेचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितलं, "बोर्डाचे अध्यक्ष तांत्रिक कारण देत आहेत. पण यामुळे बोर्डाची तयारी झाली नव्हती हे उघड आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षकांकडे विचारणा करत आहेत पण शिक्षक सुद्धा हतबल आहेत. लाखो विद्यार्थी एकाच वेळी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट उघडतील याची कल्पना बोर्डाला नव्हती का?"
 
केवळ शिक्षक संघटना नव्हे तर विद्यार्थी आणि पालकांकडून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 
शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याप्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. तसंच वेबसाईट लवकरच पूर्ववत होईल असंही त्या म्हणाल्या आहेत.
वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, "बोर्डाच्या संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याने वेबसाईट काही काळ क्रॅश झाली. याबाबत लवकरच दुरुस्ती करण्यात येत असून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. तांत्रिक बिघाडाची चौकशी सुद्धा केली जाईल. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये."
 
निकालाची वैशिष्ट्ये
दरम्यान, शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत निकालाविषयी माहिती दिली.
 
यंदा दहावीचा निकाल 99.95% लागला असून 27 विषयांचा निकाल 100% लागला आहे. यंदा 83,262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 957 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत.
 
9 विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के लागला आहे.
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल 99.96 टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल 99.94 टक्के जाहीर झाला आहे.
 
एकूण 16 लाख 58 हजार 614 शाळांपैकी 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
 
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 4.65 टक्क्यांनी अधिक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे.
 
कधी होणार अकरावी सीईटी परीक्षा?
दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी द्यावी लागणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे.
 
यंदा अकरावीचे प्रवेश दोन टप्प्यात होणार आहे. जे विद्यार्थी सीईटी परीक्षा देतील त्यांचे प्रवेश प्राधान्याने पहिल्या टप्प्यात होतील.
 
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित प्रवेश जागांवर दहावीच्या निकालाच्या आधारे प्रवेश होतील.
 
बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "अकरावी सीईटीची परीक्षा साधारण 21 ऑगस्टला होऊ शकते. त्यादृष्टीने बोर्डाची पूर्व तयारी सुरू आहे. येत्या आठवड्यापासून परीक्षेची प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरावा लागेल. तसंच परीक्षा देण्याबाबत विचारणा करण्यात येईल."
 
ही परीक्षा सीबीएसई आणि आयसीएसई या शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठीही खुली असणार आहे.