रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (10:53 IST)

रोहित पवार भगवा ध्वज अयोध्येत नेऊन नेमकं काय करू इच्छित आहेत?

- नितीन सुलताने
सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका यात्रेच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राजकीय यात्रांच्या गर्दीतल्या या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे शरद पवारांचे नातू आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांनी ही यात्रा सुरू केली आहे.
 
रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्याच्या परिसरात जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज उभारण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी 'स्वराज्य ध्वज यात्रा' सुरू केली आहे.
 
या यात्रेचा एक भाग म्हणून अयोध्येतही हा स्वराज्य ध्वज पोहोचला. या ठिकाणीदेखील या स्वराज्य ध्वजाचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर याबाबत अधिकच चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
 
मात्र, पवारांच्या कुटुंबातील सदस्यानं अशाप्रकारे यात्रा सुरू केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळं या यात्रेबाबत अनेक प्रकारचे प्रश्नदेखील उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे.
 
'स्वराज्य ध्वज यात्रा' म्हणजे रोहित पवारांचं केवळ प्रतिकात्मक पाऊल आहे, की त्यामागे इतर काही राजकीय आडाखे आहेत असाही प्रश्न आहे. मात्र त्यापूर्वी ही यात्रा नेमकी काय ते जाणून घेऊयात.
 
नेमकी काय आहे 'स्वराज्य ध्वज यात्रा'?
रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याला भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असल्यानं या परिसराला नवी ओळख मिळवून देण्याचं रोहित पवारांनी ठरवलं.
 
त्यासाठी रोहित पवारांच्या संकल्पनेतून या किल्ल्याच्या परिसरात प्रचंड मोठा असा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यात येणार आहे. हा ध्वज जगातील सर्वांत उंच ध्वज असेल, असा दावा केला जात असून, दसऱ्याला हा ध्वज उभारला जाणार आहे. हा ध्वज 74 मीटर लांबीचा असेल.
 
विशेष म्हणजे ध्वज उभारण्यापूर्वी या ध्वजाची संपूर्ण महाराष्ट्रभर यात्रा काढून प्रत्येक जिल्ह्यात या ध्वजाचं पूजन केलं जात आहे. 6 राज्यांमधल्या 74 प्रेरणास्थळांवर हा ध्वज घेऊन ही यात्रा पोहोचणार आहे. या यात्रेलाच 'स्वराज्य ध्वज यात्रा' म्हटलं आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा अभिमानास्पद इतिहास देशभरापर्यंत पोहोचवणं हाही या यात्रेचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे.
 
दसरा आणि राजकीय सोहळे
महाराष्ट्रात दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय सोहळ्यांची जुनी परंपरा आहे. राजकीय तसेच काही धार्मिक संघटनांचे कार्यक्रम हे दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर होत असतात.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळं दसऱ्याला धम्म चक्र प्रवर्तक दिन साजरा करते. नागपूरच्या दीक्षा भूमीवर यादिवशी मोठी गर्दी होत असेत.
नागपुरातच विजयादशमीच्या दिवशी आणखी एक मोठा सोहळा असतो. तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन सोहळा. या सोहळ्यातील सरसंघचालकांच्या भाषणाकडंही संपूर्ण देशाचं लक्ष असतं. संघाची स्थापनादेखील 1925 मध्ये विजयादशमीलाच झाली होती.
 
याशिवाय दसऱ्याच्या मुहूर्तावरचा राज्यातला आणखी एक प्रसिद्ध राजकीय सोहळा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा. 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात केलेल्या या दसरा मेळाव्याला 50 वर्षांपेक्षा जुना इतिहास आहे. राज्यभरातील शिवसैनिक या दसरा मेळाव्याच्या भाषणासाठी मुंबईत येत असतात.
 
तसेच गेल्या काही वर्षात मुंडे कुटुंबीयांच्या दसरा मेळाव्याच्याही अनेक चर्चा पाहायला मिळाल्या आहेत. भगवान गडावरील हा सोहळा काही राजकीय घडामोडींनंतर आता संत भगवान बाबांच्या जन्मगावी सावरगाव याठिकाणी भगवान भक्ती गडावर होतो. या सोहळ्याचीदेखील चर्चा राजकीय वर्तुळात असते.
 
या सर्व राजकीय सोहळ्यांबरोबर यंदा रोहित पवार हे विजयादशमीच्या दिवशीच खर्ड्यात जगातील सर्वांत मोठा ध्वज उभारून सोहळा घेतायत. त्यामुळं याठिकाणीही अशा प्रकारचा वार्षिक सोहळा सुरू होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
 
दसऱ्याचं धार्मिक महत्त्व
पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी बीबीसीबरोबर बोलताना विजयादशमीचं नेमकं महत्त्वं आणि या दिवसाला राजकीय महत्त्वं का प्राप्त झालं असावं याबाबत माहिती दिली.
 
अश्विन महिन्यात शेतीतील धान्य घरात आणून ठेवायचं आणि त्यानंतर शस्त्रपूजन करून लढाईला निघायचं अशी परंपरा आणि विजयादशमीचा हेतू होता. त्यालाच सीमोल्लंघन म्हटलं जायचं.
 
"विजयोत्सव साजरा करायचा असेल तर विजयादशमीला करावा असा पूर्वीपासूनचा उल्लेख आहे. तसंच आपला विजय व्हावा, भरभराट व्हावी म्हणूनही या दिवशी पुजा, नवी सुरुवात केली जाते."
 
"राजकीय पक्षांनी प्रामुख्यानं सिमोल्लंघन या संकल्पनेतून, म्हणजेच पक्ष वाढवण्यासाठी हा दिवस निवडला असावा. या दिवशी सुरू केलेल्या कामात विजय मिळणार या विश्वासातून मेळावे, राजकीय सोहळे होत असावेत," असं दा.कृ.सोमण म्हणाले.
 
यादिवशी वाईट प्रवृत्तीचा नाश चांगल्या प्रवृत्तीनं केला. त्याचप्रमाणे समाजातील भ्रष्टाचार किंवा इतर वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सतप्रवृत्ती कामाला लागतात, त्यामुळं असे मेळावे घेतले जातात असंही सोमण म्हणाले.
 
'मतदार, तरुणांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न'
'स्वराज्य ध्वज' यात्रेबाबत एक प्रश्न वारंवार समोर येत आहे. तो म्हणजे रोहित पवारांनी अशाप्रकारची यात्रा काढण्याचं नेमकं कारण काय? किंवा त्याचे राजकीय अर्थ काय? राजकीय विश्लेषक, तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टीनं याचं विश्लेषण केलं आहे.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्या मते, या सर्वामागे रोहित पवार यांचा मुख्य उद्देश हा प्रामुख्यानं त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून मतदार आणि विशेषतः तरुणाईचा पाठिंबा मिळवणं हा असू शकतो.
 
मात्र, "पवार कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं अशा प्रकारे, भावनिक अंगानं जाणारं प्रतिकांचं राजकारणं करणं, हे एकप्रकारचं कोडंच आहे. तसंच ते सर्वसामान्यांना रुचणारंही नाही," असंही विजय चोरमारे म्हणाले.
 
"महाराष्ट्राची परंपरा आणि इतिहास पाहता भगव्या झेंड्याला विशेष महत्त्व आहे. संतमंडळी, वारकरी परंपरा हे तर आहेच. पण त्याचबरोबर अठरापगड जातीतील बहुजन समाज भगव्या झेंड्याखाली एकवटलेला आहे. याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला असावा," असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं.
 
"त्याचवेळी रोहित पवार हे सज्जन आणि परिस्थितीचं भान असलेले राजकारणी आहेत, त्यामुळं भगवा ध्वज हाती घेतला असला तरी धार्मिक नव्हे तर प्रतिकात्मक पद्धतीनं ते त्याचा वापर करतील," असंही उन्हाळे यांनी म्हटलं आहे.
'भाजपला विरोधासाठी गरजेचं!'
"भाजपनं केवळ भगवा आणि भगवा याच्या आधारेच सत्ता मिळवली आहे. त्यामुळं जर भाजपला विरोध करायचा असेल तर, अशा गोष्टीपासून दूर न जाता, उलट आपलाही याला विरोध नसल्याचं दाखवून देण्याचा विचार यामागे असू शकतो," असं मतही उन्हाळे यांनी मांडलं.
 
सध्या विविध धर्म, समाज आणि समुदायांनुसार पक्षांमध्ये मतदार विभागले गेलेले आहेत. त्यामुळं स्वराज्याच्या भगव्याखाली सर्वसमावेशक मतदार एकटवटण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असंही उन्हाळे म्हणाले.
 
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनीही असंच मत व्यक्त केलं. भविष्यातल्या राजकारणाची दिशा लक्षात घेऊन रोहित पवारांनी हे पाऊल उचललं असावं, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
 
"तळागाळातील लोकांसाठी विकासाचं जे काम करायचं आहे, ते करत राहायचं. मात्र तेवढ्याने भागणार नाही. त्यामुळं राजकारणात निभाव लागण्यासाठी अशा प्रतिकांचा वापर करून पुढं जात, भावनिक राजकारण करणंही गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असावा," असं चोरमारे म्हणाले.
 
'कॉपी करण्याचा प्रयत्न'
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांच्या मते, "भाजपच्या हिंदुत्वाची कॉपी केली की, राजकारणात फायदा मिळतो असं राजकीय पक्षांना वाटतं. त्यातून अशा प्रकारचे निर्णय होऊ शकतात."
 
''हिंदुत्वाच्या किंवा धार्मिक मुद्द्यांमुळं कोणत्या बाजूला जायचं या विचारात किंवा काठावर असलेल्या मतदाराला चुचकारण्यासाठी आणि आपल्या बाजूला ओढण्यासाठी, हा प्रयत्न असू शकतो," असं मत राजेंद्र साठे यांनी मांडलं.
 
राजकारणात अशा प्रकारे विचारांच्या विरोधाभासी भूमिका घेणारे रोहित पवार हे काही पहिलेच नाहीत, याकडंही संजीव उन्हाळे यांनी लक्ष वेधलं.
 
"असं काही करणारे रोहित पवार एकटेच नाही. काँग्रेसच्या राहुल गांधी यांनीही अशाप्रकारे मंदिरात जाणं, देवांच्या पाया पडणं असे प्रकार केले आहेत. त्यांच्यापूर्वी एकाही काँग्रेस नेत्यानं तसं केलं नव्हतं," असंही उन्हाळे म्हणाले.
 
"एखादा धर्म किंवा भगवा ही काही मोजक्या लोकांची किंवा पक्षांची मक्तेदारी नाही. त्यामुळं अशाप्रकारे विकासाचं राजकारण करताना, भविष्यातली गरज म्हणून या प्रतिकांचा वापर त्यांनी सुरू केला असावा," असं मत विजय चोरमारे यांनी मांडलं.
 
रोहित पवारांची भूमिका आणि पक्ष
रोहित पवार यांनी मतदारसंघात भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आव्हानांचा विचार करून हा उपक्रम हाती घेतला असावा. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका म्हणून याकडं पाहण्याचं कारण नाही, असं मत विजय चोरामारे यांनी व्यक्त केलं.
 
राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनीही अशाच प्रकारचं मत मांडलं आहे.
 
"शरद पवार हे महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी आहेत. ते याला फार मोठं होऊ देतील असं वाटत नाही. त्यासाठी ते कधीही परवानगी देणार नाहीत. उलट हा मुद्दा सर्वसमावेशकतेचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढं आणेल," असं संजीव उन्हाळे म्हणाले.
 
एखाद्या राजकीय पक्षाची यात्रा आणि तीही भगवा ध्वज घेऊन निघालेली, असं म्हटलं की साहजिकच काही ठरावीक पक्षांचं नाव डोळ्यासमोर येतं. मात्र आता हेच चित्र बदलण्याचा प्रयत्न राजकारणातली ही नवी पिढी करत असल्याचं दिसतंय.
 
phot: Rohit pawar twitter