गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2024 (12:08 IST)

दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातला नेमका वाद काय?

विधिमंडळाच्या आवारात शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत वाद झाल्याचं समोर आलं आहे. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे हे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. या वादात भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली.
 
त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला आहे. जर विधीमंडळाच्या आवारात सत्ताधारी आमदारांची अशी गुंडागर्दी होणार असेल तर याचं स्पष्टीकरण सरकारने सभागृहात द्यावं, अशी मागणी पाटील यांनी केली. महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणाविषयी माध्यमांना माहिती दिली आहे. तर दादा भुसेंनी या प्रकरणाबाबत विधिमंडळात स्पष्टीकरण दिलं आहे.
 
भुसे आणि थोरवेंचं स्पष्टीकरण
माध्यमांशी बोलताना थोरवे म्हणाले, "एका कामासंदर्भात दोन महिन्यांपासून मी दादा भुसेंकडे पाठपुरावा करत होतो. ते काम करण्यास मी त्यांना सांगितलेलं होतं. कालच्या बोर्ड मीटिंगला त्यांनी ते काम जाणीवपूर्वक घेतलं नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितलेलं होतं. तरीसुद्धा दादा भुसेंनी जाणीवपूर्वक ते काम घेतलेलं नाही. मग मी आज त्यांना विचारलं की हे काम तुम्ही का घेतलं नाही? तर ते माझ्याशी थोडंसं उद्धटपणे बोलले. तिथं आमच्यात थोडंसं झालं."
 
थोरवे पुढे म्हणाले, "आमदारांचे जे काही पेंडिंग कामं आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत. एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांची कामं करून देतात. मंत्री महोदयांनीही पटापट कामं करुन द्यायला पाहिजे. मतदारसंघातील कामाच्या बाबतीत बोलत असताना आमच्यात थोडा वाद झाला. आमच्यातला वाद आता मिटलेला आहे. आमच्यात धक्काबुक्की किंवा मारामारी काही झालेली नाही."
 
याविषयी स्पष्टीकरण देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, "माझ्यात आणि आमदार थोरवे यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या चालू आहेत. पण, असा कसलाही प्रकार घडलेला नाहीये. थोरवे माझे सहकारी मित्र आहेत. असा कोणताही प्रकार झालेला नाही. मी या बातम्यांचं खंडन करतो. आपल्याला सीसीटीव्ही वगैरे पाहायचे असेल तर ते पाहायला हरकत नाही."
 
या प्रकरणावर विधिमंडळात बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सभागृहात अशी घटना घडत असेल तर ते गंभीर आहे. अध्यक्ष महोदय माहिती घ्या. सीसीटीव्ही फुजेट पाहा. 15-20 आमदार होते तिथं सर्व पक्षाचे. जी फ्री-स्टाईल सुरू होती, ते ती बघत होते." काँग्रेसे नेते नाना पटोले म्हणाले की, "ही विधीमंडळ परिसरात घडलेली घटना आहे, तिला गांभीर्यानं घ्यायला हवं. अध्यक्ष महोदय घटनेचं गार्भीर्य लक्षात घ्या."
 
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, "दादा भुसे आणि महेंद्र थोरवे हे दोघेही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचा मंत्री आपल्याच पक्षातील आमदाराचे म्हणणे ऐकत नसेल, तर याचा अर्थ ते महाराष्ट्राच्या जनतेला काय बरं देऊ शकतील हे चित्र महाराष्ट्रासमोर जात आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवं."
 
Published By- Dhanashri Naik