गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2024 (11:22 IST)

नरेंद्र मोदी सत्तेत येणार नाही, ही माझी भविष्यवाणी आहे - लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीचाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. 'इंडिया' आघाडी विखुरली असल्याचं लोकांना वाटलं होतं. पण आता ही आघाडी पुन्हा रुप घेऊ लागली आहे, असंही ते म्हणाले. लालू प्रसाद यादव यांच्याशी बीबीसीनं चर्चा केली, त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर मतं मांडली. भाजपच्या विजयाचा दावा फेटाळून लावत लालू यांनी माध्यमं अत्यंत डरपोक असल्याचा आरोपही केला. "पूर्ण मीडिया विकला गेला आहे. त्यांच्या मनात फक्त मोदी-मोदी आहे. पण यावेळी मोदी येणार नाहीत. माझं भाकित आहे. मोदी जिंकणार नाहीत. 'इंडिया आघाडी'च जिंकेल," असं लालू प्रसाद यादव म्हणाले. 'इंडिया' आघाडीतील अनेक महत्त्वाचे पक्ष बाहेर पडल्यामुळं या आघाडीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाहेर पडलेल्यांमध्ये सर्वांत महत्त्वाचे नाव म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं आहे. एक वेळ अशी होती की, नितीश कुमार हे 'इंडिया' आघाडीचे प्रमुख स्तंभ समजले जात होते. पण नुकतीच त्यांनी या आघाडीशी फारकत घेत भाजपच्या साथीनं सरकार स्थापन केलं आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशातील जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) पक्षही पुन्हा 'एनडीए'मध्ये सहभागी झाला आहे. एकेकाळी राजकारणातील विरोधकांपैकी महत्त्वाचा चेहरा समजले जाणारे लालू प्रसाद यादव सध्या आजारपणामुळं फारसे सक्रिय नाहीत. त्यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उप-मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे. पण बीबीसीबरोबर बोलताना लालू प्रसाद यादव यांनी अगदी मोकळेपणाने मते मांडली. त्यांनी 'इंडिया' आघाडीची बाजू मांडण्याचा प्रयत्न देखील केला. "सगळे एकत्र येत आहेत. जे निघून गेले, ते गेले. ते गेले असं लांबून दिसत असलं तरी जनता गेलेली नाही," असं लालू म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 'इंडिया' आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनीही बंगालमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या न्याय यात्रेत सहभागी होण्यासही त्यांनी नकार दिला होता. काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीनं ममता बॅनर्जी यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. संदेशखालीच्या घटनेवरून तर काँग्रेसचे राज्यातील अनेक नेते ममता बॅनर्जींच्या विरोधात रणांगणात उतरले आहेत. विरोधी आघाडीच्या सूत्रधार ठरलेल्या ममता बॅनर्जी एकट्या लढल्यानं नेमका काय परिणाम होईल? या प्रश्नाचं उत्तर देताना लालू प्रसाद यादव यांनी, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार नाही, त्या सोबतच राहतील असा दावा केला. उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात जागांबाबत एकमत होणार नाही, असं आधी वाटलं होतं. पण गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून एकमत झाल्यामुळं 'इंडिया' आघाडीला यश मिळालं आहे. त्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्येही दिल्ली आणि गुजरातबाबत एकमत झालं. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राहुल गांधींच्या यात्रेवर होणाऱ्या टीकेवरूनही लालू यादव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधींसमोर पर्याय नसल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळला. "त्यांची कोणतीही कमजोरी नाहीये किंवा काहीही नाइलाज झालेला नाहीये. बसून राहून काम होत नसतं. लोकांमध्ये जनजागृती करायची असते. लोकांना कायम जागं करत राहावं लागतं," असंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
 
राहुल गांधी सर्वांना सोबत घेऊन चालत नसल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला.त्याचबरोबर राहुल गांधींनी आता फिरणं बंद करून, लोकांना एकत्र करायला सुरुवात करायला हवी, असा सल्लाही लालू प्रसाद यादव यांनी दिला. "आता वेळ शिल्लक नाही. जागावाटप करुन तयारी करायला हवी," असा सल्ला त्यांनी राहुल गांधींना दिला. लालू प्रसाद यादव यांनी या मुलाखतीत नलिन वर्मा यांच्या साथीनं लिहिलेल्या 'गोपालगंज टू रायसीना' या पुस्तकाबाबतही चर्चा केली. राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना लालू यांनी कर्पुरी ठाकूर, लोहिया आणि जगदेव प्रसाद त्यांचे आदर्श असल्याचं सांगितलं. "जगदेव प्रसाद यांनी वंचितांसाठी बलिदान दिलं," असं ते म्हणाले. जगदेव प्रसाद यांना गरिबांच्या बाजूनं भाषण करताना, कशाप्रकारे गोळ्या घातल्या होत्या, हेही लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं. "हे सर्व आपले आदर्श आहेत," असंही ते म्हणाले.
 
आडवाणींची रथ यात्रा
लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या पुस्तकात भाजपचे माजी अध्यक्ष आणि माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची रथयात्रा आणि बिहारमध्ये ती यात्रा अडवण्याच्या विषयावर सविस्तर लिहिलं आहे. 1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली होती. पण बिहारमध्ये त्यांची रथयात्रा अडवली होती. त्यावेळी लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय जीवनातील हा सर्वांत मोठा निर्णय समजला जातो. लालू प्रसाद यादव यांनी त्या घटनेच्या आठवणींना उजाळा दिला. "बिहारचा मुख्यमंत्री असल्यानं राज्य आणि देशाला चांगला, धर्मनिरपेक्ष संदेश देणं हे माझं कर्तव्य होतं. सत्ता राहो अथवा जावो पण संविधानाला कोणीही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केलं जाणार नाही," असं ते म्हणाले. आडवाणींना समजावण्यासाठी दिल्लीपर्यंत गेलो आणि त्यांना हे सर्व थांबण्याची विनंतीही केली होती, असं ते म्हणाले. "पण ते फार चिडले. इथं कुणी आईचं दूध पिलेलं आहे का जो आमचा रथ अडवू शकेल? असं ते म्हणाले. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही आईचं दूध पिलेलं आहे की नाही किंवा पावडरचं दूध पिलंय ते मला माहिती नाही. पण मी म्हशीचं दूध पिलं आहे आणि मी तुम्हाला सोडणार नाही. त्यानंतर आम्ही समस्तीपूरमध्ये त्यांना अटक केली," असं लालू प्रसाद यादव म्हणाले. "आडवाणींना अटक झाल्याने संपूर्ण देश हादरला. आम्ही त्यांना अटक केली आणि व्ही.पी.सिंग यांचं सरकार कोसळलं. या लोकांनी (भाजप) पाठिंबा काढून घेतला. आम्ही सरकार गमावलं. बाबरी मशीद वाचवण्यासाठीचा हा आमचा प्रयत्न होता," असं लालू म्हणाले. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी असं करायला सांगितलं होतं का? असा प्रश्न आम्ही विचारला. त्यावर कोणत्याही नेत्यानं किंवा दुसरं कुणी काही सांगितलं नव्हतं. मी स्वतः निर्णय घेऊन आडवाणींना अटक केली होती, असं लालू यादव म्हणाले. तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्यांना असं करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला होता, असंही लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. पण लालूंनी त्यांना, तुम्हाला सगळ्यांना सत्तेची नशा चढल्याचं सुनावलं होतं.लालकृष्ण अडवाणी कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत, असं लालू प्रसाद यादव यांनी एकदा म्हटलं होतं. पण आता ते म्हणतात की, आधी आडवाणींनी पंतप्रधान बनायला हवं होतं. पण मोदी बनले. भारतरत्न दिल्यानंतर त्यांनी आडवाणींचं अभिनंदन केलं, असंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
 
'धार्मिक शक्तींशी हातमिळवणी नाही'
लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही धार्मिक शक्तींशी हातमिळवणी केली नाही, असं म्हटलं जातं. त्यांच्याबरोबर राहिलेल्या अनेक नेत्यांनी आणि त्या नेत्यांच्या पक्षांनी अनेकदा भूमिका बदलली आहे. बिहारमध्येच नितीश कुमार दीर्घकाळ भाजपबरोबर राहिले. त्यानंतर 'आरजेडी'बरोबर महाआघाडीत आले आणि सरकारही स्थापन केलं. पण आता ते पुन्हा भाजपबरोबर आहेत. त्याशिवाय बिहारमधलेच त्यांचे सहकारी राहिलेले जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव आणि राम विलास पासवान यांनीही अनेकदा भाजपशी हातमिळवणी केली. पण लालू प्रसाद यादव कधीही भाजपबरोबर गेले नाहीत. "कधीही धार्मिक शक्तींसमोर झुकलो नाही किंवा त्यांच्याबरोबर गेलो नाही. कायम त्यांना संपवण्याचा विचार केला," असं लालू प्रसाद यादव याबाबत बोलताना म्हणाले. तेजस्वी यादव कधी या मुद्द्यावर भूमिका बदलतील का? असंही आम्ही लालू यांना विचारलं. लालू प्रसाद यादव म्हणाले की, "तेजस्वीही कधीच धार्मिक शक्तींशी हातमिळवणी करणार नाही." पण तसं असलं तरी, नितीश कुमार यांच्याबरोबर वारंवार हातमिळवणी करण्यावरून लालू यादव यांच्यावर कायम प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे. यावर लालू प्रसाद यादव म्हणाले की, "आम्ही वारंवार नितीश कुमारांबरोबर जात नाही. ते वारंवार आमच्याकडं येतात." नितीश कुमार यांच्या महाआघाडीत परत येण्याच्या बाबतीत लालू प्रसाद यादव यांनी आता ते पुन्हा कसे येणार, असा उलटप्रश्न केला. राजकीय नेते म्हणून मागं वळून पाहिल्यानंतर, एका सामान्य कुटुंबात जन्माला आल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करुन या उंचीपर्यंत पोहोचल्याचं आश्चर्य वाटत असल्याचंही, लालू प्रसाद यादव बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले. इतिहास तुम्हाला कसं स्मरणात ठेवेल? असा प्रश्न आम्ही लालू यांना विचारला. त्यावर, "सामाजिक न्याय, गरिबांचा आवाज, शक्ती आणि धाडस. आम्ही गरिबांना खूप बळ दिलं. त्यासाठी आम्हाला तुरुंगातही जावं लागलं. अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. लोक ते स्मरणात ठेवतील," असं ते म्हणाले. माध्यमांवर लालू प्रसाद यादव यांची काहीशी नाराजी दिसली. "मीडियाबाबत काय बोलायचं? मीडियावाले तर मी मिमिक्री करतो, असंच म्हणायचे." सोनिया गांधी आवडीच्या नेत्या असल्याचं लालू प्रसाद यादव म्हणाले. त्या अत्यंत दृढ आणि समजदार नेत्या आहेत, असं लालू म्हणाले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचं भवितव्य उज्ज्वल असल्याचंही लालू प्रसाद यादव यांनी या मुलाखतीत म्हटलं.
 
Published By- Dhanashri Naik