1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (16:03 IST)

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

What is the political significance of the meeting between Sharad Pawar and Uddhav Thackeray? marathi regional; news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली.दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली.
 
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते.
 
शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारसंबंधी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडतायेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.
 

ही भेट का महत्वाची?
शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये बराचवेळ झालेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं,"ही भेट बीबीडी चाळीच्या पुर्नविकासासंदर्भात होती. त्याचबरोबर जी पोलीसांची घरं आहेत त्यांचाही विकास कश्यापध्दतीने करता येईल याबाबत चर्चा झाली. यासाठी शरद पवार यांच्याबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते."
 
ही भेट राजकीय नसल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
 
पण 28 जूनला सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते लगेचच शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांना भेटले होते.
 
त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. या विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घ्यावं. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारा त्रास थांबेल अशी भावना व्यक्त केली होती. या पत्रानंतर शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.
 
या सगळ्या घडामोडीनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीचं राजकीय महत्व वाढलं.
 

शरद पवारांना हवी स्पष्टता?
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर काही दिवसांत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपबरोबर जुळवून घेण्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर संजय राऊत यांच्या मातोश्रीवरच्या फेर्‍या वाढल्या.
 
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे याबाबत बोलताना सांगतात, "काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची भाजपबद्दलची भूमिका मवाळ झालेली दिसतेय. शिवसेना भाजपची जवळीक वाढत चालली आहे का? याबाबत असंख्य चर्चा आहेत.
 
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैयक्तिक संबंध अजून चांगले आहेत असं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते 'नरेंद्रभाईच' आहेत असं ते म्हणाले. या सगळ्याची स्पष्टता शरद पवार यांना हवी असेल. काही निर्णय घेताना त्यातल्या समन्वयांविषयीही बोलणं झालं असण्याची दाट शक्यता आहे. "
 

चौकशीच्या फेर्‍यांचं करायचं काय?
सध्या महाविकास आघाडी सरकारमधले अनेक नेते ईडी चौकशीच्या फेर्‍यांमध्ये अडकले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावरून ईडीने चौकशीला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरू आहे.
 
सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. शिवसेना नेते रवींद्र वायकर, अनिल परब आणि संजय राऊत यांच्याभोवतीही चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. याबाबत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल? हा मुद्दाही या भेटीत चर्चेला आला असल्याची माहिती आहे.
 

समन्वय राखण्याचे प्रयत्न?
महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दीड वर्ष उलटून गेलं पण अद्याप महामंडळावरच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. तीन पक्षांमध्ये मंत्री पदांचं वाटप झाल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या मोजक्या नेत्यांच्याच गळ्यात मंत्री पदाची माळ पडली. काही नेते आजही सत्तेबाहेर असल्यामुळे नाराज आहेत.
 
मागच्या आठवड्यात महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक झाली होती. यामध्ये महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत चर्चा झाली होती. पण कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या याबाबत तीनही पक्षात मतमतांतरे आहेत. याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कालच पार पडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत महामंडळ नियुक्तीबद्दल चर्चा झाल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्येही हा तिढा कसा सोडवायचा याची चर्चा झाल्याचं बोललं जातंय.
 
मंत्र्यांचे निर्णय त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप यामध्येही समन्वय राहावा यासाठीही शरद पवार आग्रही असल्याचं समजतय.याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार दिपक भातुसे सांगतात, "काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांबाबत घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर त्यात तोडगाही काढण्यात आला. पण समन्वयाच्या अभावाची चर्चा झाली. कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी स्वबळावर लढण्याचा नारा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्याबाबत निश्चितपणे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असू शकते."