शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (23:36 IST)

सुधा मूर्ती आणि संभाजी भिडेंच्या भेटी मागचं नेमकं सत्य काय?

ANI
लेखिका सुधा मूर्ती शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या पाया पडत असल्याचे फोटो एएनआय वृत्तसेवा संस्थेनं ट्वीट केले आहेत. यावरून सोशल मीडियासह सर्वत्र चर्चेला सुरुवात झालीय.
 
एएनआयनं सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीचे फोटो शेअर करताना म्हटलं की, "लेखिका आणि उद्योजिका सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांची सांगलीत भेट घेऊन आशीर्वाद घेतले."
 
या ट्वीटसोबत एएनआयनं तीन फोटोही जोडले आहेत. यातील दोन फोटोंमध्ये सुधा मूर्ती या भिडेंशी चर्चा करताना दिसतायेत, तर एका फोटोत सुधा मूर्ती या भिडेंच्या पाया पडून आशीर्वाद घेत आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच 'साम मराठी' वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला टिकली न लावल्याचं कारण देत प्रतिक्रिया देण्यास भिडेंनी टाळलं होतं. त्यावरून वाद झाला होता आणि भिडेंवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.
 
त्यानंतर सुधा मूर्तींनी भिडेंची भेट घेतल्याचं वृत्त एएनआयनं दिल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
 
मात्र, मेहता पब्लिशिंग हाऊसच्या संपादक योजना यादव यांनी यी भेटीचा तपशील सांगत एएनआयच्या बातमीचं खंडन केलंय.
 
सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसकडून प्रकाशित केले जातात. त्यामुळे योजना यादव यांच्या स्पष्टीकरणाला महत्त्व आलंय आणि त्यांचं हे स्पष्टीकरण सोशल मीडियावर सध्या सर्वत्र शेअर केलं जात आहे.
 
संभाजी भिडेंनी हद्दच केली- योजना यादव
योजना यादव त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात की, "ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते. सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. पण हे महाशय हट्टाला पेटले होते. ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांचं हॉटेल शोधलं.
"सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथं पोहोचले. परत गेले. सुधा मूर्ती दुपारी हॉटेलवर आल्या आणि रूमवर विश्रांतीला गेल्या. संध्याकाळी 5 ला कार्यक्रम होता. हे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये ठाण मांडून बसले. शेवटी सुधाताईंना मी मागच्या दरवाज्याने बाहेर काढलं.
 
"त्या गाडीत बसताना भिडेंचे कार्यकर्ते पळत आले, तर तिथून आम्हाला अक्षरशः गाडी दामटायला लागली. गाडीत त्या मला म्हणाल्या, कोण आहे ही व्यक्ती? त्यांना मी परिचय सांगितला. तर त्या थोड्या त्रासल्याच होत्या. म्हणाल्या, यांना मला भेटून काय करायचं आहे? ते त्यावेळी आम्हालाही माहीत नव्हतं.
 
"आम्ही हॉलवर पोहोचलो. कार्यक्रम वेळेत सुरू झाला."
 
"आमचा नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरळीत सुरू होता. तिकडे भिडेंचे कार्यकर्ते हॉल बाहेर जमा व्हायला लागले. तसं पोलिसांना टेन्शन येऊ लागलं. पोलिसांना फक्त काही अघटित घडू नये म्हणून काळजी घ्यायची होती. म्हणून ते आमच्या मागे लागले की तुम्ही दोन मिनिट भिडेना त्यांना भेटू द्या.
 
कार्यक्रमाच्या मध्यात वाचकांना सोडून सुधा ताईंना उठायचं नव्हतं. तरी त्या नाईलाजाने उठल्या. आणि वैतागून भेटायला गेल्या. त्याआधी त्यांनी मला त्यांचं वय विचारलं फक्त. फार वयस्कर असतील तर त्या नमस्कार करतात म्हणून. त्यांना पाहिल्यावर ते त्यांना फार म्हातारे वाटले म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला.
"सुधाताईंनी मला हॉटेलवर परत जाते वेळी सांगितलं की भिडे त्यांना म्हणत होते की त्यांना दीड तास बोलायचं आहे. सुधाताई म्हणाल्या माझ्याकडे दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. नंतर आमची सुधाताईंचा फोटो वापरून कसा प्रोपौगंडा होईल यावरही बोललो. सुधाताई म्हणत होत्या, ' योजना, अगं अशा लोकांशी आपण काय बोलणार. त्यांना भेटायचं असेल आणि आपल्याला शक्य असेल तर भेटून घ्यायचं. आणि सोडून द्यायचं' आणि ANI सारख्या मीडियाने ही अशी बातमी देणं म्हणजे सगळ्यांत दुर्दैव आहे."
 
योजना यादव खोटं बोलत आहेत - पवार
सुधा मूर्ती आणि संभाजी भिडेंच्या भेटीवरून मेहता पब्लिशिंग हाऊसच्या योजना यादव यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर शिव प्रतिष्ठानकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
 
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सांगली प्रमुख हणमंत पवार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले "सुधा मूर्तीताई या फार मोठ्या व्यक्तीमत्व आहेत. भिडे गुरुजी आणि त्यांची ओळख फार जुनी आहे. वर्षापूर्वी दोनदा सुधा मूर्ती यांनी भिडे गुरुजी यांना भेटण्यासाठी फोन केला होता. काही कारणामुळे भेट होऊ शकली नाही. योगायोगाने त्या सांगलीमध्ये आल्याने त्यांना सांगूनच आम्ही त्यांची भेट घेतली आहे. गुरुजी न सांगता गेले, असं काहीही नाही."
 
"दुसरी बाजू म्हणजे जर त्यांना खरंच गुरुजींना भेटायचं नसतं तर त्या हॉटेलमधून ज्या पद्धतीने बाहेर गेल्या तसंच भावे नाट्यमंदिर मधूनही गेल्या असत्या. पण असं न करता त्यांनी गुरुजींना बसायला खुर्ची देऊन नमस्कार घातला नसता. आणि जर त्यांना गुरुजींना टोलवायचं असतं तर दोन शब्द बोलल्या असत्या आणि गुरुजींना तुमचं सगळं मला मान्य आहे,पण माझ्याकडे आता वेळ नाही, असं सांगून निघून गेल्या असत्या. पण असं न करता सुद्धा मूर्ती यांनी गुरुजींचं म्हणणं ऐकून घेतलं," असं पवार पुढे म्हणाले.
 
"या गोष्टीला आपण साक्षीदार आहोत. ज्या कोणी यादवताई आहेत त्यांचा आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने निषेध करणार आहोत. कारण त्यांनी चुकीची माहिती दिली आहे. तसंच सुधा मूर्ती या भिडे गुरुजींच्या बद्दल असणारं मत योजना यादव यांच्याकडे व्यक्त करतील एवढ्या मोठ्या व्यक्ती योजना यादव नाहीत. सुधा मूर्ती यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्या गुरुजींच्या बद्दल असं काही बोलू शकणार नाहीत. योजना यादव या खोटं बोलत आहेत," असंही हणमंत पवार यांनी सांगितला आहे.
 
सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला. ते म्हणाले, 'संभाजी भिडे गुरुजी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते.मात्र त्याआधी संभाजी भिडे गुरुजी हे हॉटेलवर सुधा मूर्ती यांना भेटण्यासाठी गेले होते,तिथे आयोजकांच्याकडून त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटण्याबाबतच सांगण्यात आलं,त्यामुळे ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आले असणार,तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचल्यावर भिडे यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून मेहता पब्लिशिंगचे अखिल मेहता यांच्याशी संपर्क सुरू होता.'
 
'सुधा मूर्ती प्रसिद्ध व्यक्ती असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,मात्र आयोजकांच्याकडे कोणत्याही प्रकारची विनंती संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेण्याबाबत करण्यात आली नाही.शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार यांच्याकडून अखिल मेहता व आयोजकांशी संपर्क सुरू होता,त्यानंतर संभाजी भिडे यांना स्टेजच्या मागे मेहता पब्लिशिंग या आयोजकांच्याकडून बसवण्यात आलं होतं,त्यानंतर अखिल मेहता हे सुधा मूर्ती यांच्याकडे गेले होते,त्यानंतर काही वेळाने सुधा मूर्ती या संभाजी भिडे गुरुजी यांना भेटण्यासाठी आल्य,यावेळी पोलिसांच्या कडून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये,यासाठी खबरदारी घेण्यात आली.पण भिडे यांची भेट घेण्याबाबत विनंती करण्यात आली नाही असंही अभिजीत देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
 
Published By- Priya Dixit