शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय करतात ?

मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ठाकरे कसे आहेत यासंदर्भात नुकतीच सरदेसाई यांनी एक पोस्ट केली होती. ही पोस्ट मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे.
 
मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज यांचा स्वभाव असल्याचे सरदेसाई यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. “‘प्रकाश’ हे दादरच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीतील एक मानाचं पान… लॉकडाऊन दरम्यान मागील ७० दिवस बंद असलेलं हे उपाहारगृह फक्त पार्सल करीता सुरु झालं आणि पहिल्याच दिवशी या उपाहारगृहातून माझ्या घरी पार्सल आलं. आश्चर्य वाटलं… नंतर कळलं की राजसाहेबांनी माझ्यासह त्यांच्या अनेक मित्र व स्नेही यांच्याकडे अशीच पार्सलं पाठवली,” असं सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
 
परदेशामध्ये गेल्यावरही मराठी उद्योजकांकडून खरेदी करण्याला राज यांचे प्राधान्य असतं असं सरदेसाई सांगतात. “प्रकाशमधून खाणं पार्सल पाठवणं हे तर एक उदाहरण झालं, पण अशाच अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. धारगळकर यांची माहीमची ‘प्रसाद बेकरी’ असो, चितळे बंधू असो की रत्नागिरीतले भिडेंचं ‘योजक’ असो. मराठी उद्योजकांकडूनच खरेदी करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. बरं, खरेदी ही एवढी की एखादी गाडी फक्त सामानानेच भरून जावी! परदेशात गेल्यावर सुद्धा जर तिथे एखाद्या मराठी माणसाचे दुकान अथवा व्यवसाय असल्यास ते हटकून त्याच्याकडेच खरेदी करतात,” असं सरदेसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
राज हे जगभरातील मराठी व्यवसायिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असतात असं सांगताना सरदेसाई यांनी एक किस्सा या पोस्टमध्ये सांगितला आहे. “काही वर्षांपूर्वी आम्ही लंडनमध्ये असताना तिथे वडापावचे हॉटेल सुरु करत असल्याचे काही मराठी तरुणांनी भेटून सांगितले. राजसाहेबांनी आत्मीयतेने त्यांच्याकडून सगळी माहिती आणि त्यांच्या भविष्यातील योजना ऐकून घेतल्या आणि मुंबईत आल्यावर भेटायचे आमंत्रण सुद्धा दिले. एवढेच नव्हे तर जितके दिवस आम्ही लंडनमध्ये होतो तितके दिवस, भेटणाऱ्या प्रत्येकाला आणि नंतरही मुंबईतून लंडनला जाणाऱ्या प्रत्येक मित्राला तिथे जाऊन वडापाव खाण्याचा आदेश वजा आग्रह ते करत होते,” असं सरदेसाई यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
सरदेसाई यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट मनसेच्या अधिकृत अकाउंटवरुन ट्विट करण्यात आला आहे. ‘मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावा; ह्यासाठी कटाक्ष असणारा नेता म्हणजे राज ठाकरे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितला अनुभव,’ अशी कॅप्शन देत हा स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आला आहे.