गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (12:52 IST)

शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे शरद पवार,अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय

ajit pawar
दीपक केसरकरांनी जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. “दीपक केसरकर यांना आम्हीच तिकीट देऊन आमदार केलं होतं. ते आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांनी माहिती घेऊन बोलावं असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते  पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.
 
अजित पवार म्हणाले, “दीपक केसरकर १९९२ मध्ये फार ज्युनियर होते. त्यावेळी ते आमच्याच पक्षात होते. आता केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते झाले आहेत. त्यांनी अशाप्रकारची वक्तव्यं करताना फार विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक केली पाहिजेत. प्रवक्त म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये. बारकाईने माहिती घ्यावी.”
“माझ्या माहितीप्रमाणे १९९२ ला पहिल्यांदा शिवसेना फुटली तेव्हा शरद पवार महाराष्ट्रात नव्हते. ते केंद्रात संरक्षण मंत्री होते. तेव्हा सुधाकर नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा शिवसेना मंडल आयोगाच्या निमित्ताने फुटली. शिवसेनेने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीबाबत वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका छगन भुजबळ व इतर १८ सहकाऱ्यांना पटली नाही. म्हणून ते बाहेर पडले. दुसऱ्याच्या नावावर पावती फाडण्याचं कारण नाही,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.