बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (19:33 IST)

समीर वानखेडेंच्या चैत्यभूमी प्रवेशावरून गोंधळ का? नेमकं काय घडलं?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे आज (6 डिसेंबर) महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याविरोधात आणि समर्थनार्थ अशा दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात. समीर वानेखेडे त्याठिकाणी पोहचले असता जमावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा काहीही अधिकार नसल्याचं ते म्हणाले.
समीर वानखेडे यांना प्रवेश देऊ नये अशीही मागणी काही जणांनी केली, तर काही जणांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा केल्या. त्यामुळे दोन गटांमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र पहायला मिळालं. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद निवळला.
'आंबेडकरी जनतेचा वापर केला जातोय'
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आज पहाटेपासूनच अनुयायांची गर्दी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांनुसार प्रत्येकाला रांगेत आतमध्ये प्रवेश दिला जात होता. विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्तेही याठिकाणी उपस्थित होते.
समीर वानखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर बाहेर पडत असताना त्यांना विरोध दर्शवण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना घोषणाबाजी केलेल्या काही लोकांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "समीर वानखेडे यांना बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे. त्यांना अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे. समीर वानखेडे यांना इथे येण्याची काय गरज भासली? इथे येणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. सर्व धर्माच्या लोकांचं इथे स्वागत आहे. पण वानखेडे यांनी इथे येणं म्हणजे आंबेडकरी समाजाचा वापर केल्यासारखं आहे असं आम्हाला वाटतं."
य़ा घटनेशी आमचा कुठलाही संबंध नसल्याचं चैत्यभूमीवर आजच्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी सांगितलं.
अनुयायी म्हणाले, "दिवसभर चैत्यभूमीवर लोक महापरिनिर्वाण दिनादिवशी येत असतात. सामान्य लोकांपासून ते अधिकारी, राजकीय नेते सर्वजण इथे येतात. इथे येण्याचा अधिकार सर्वांना आहे. समीर वानखेडे इथून जात असताना काही लोकांनी घोषणाबाजी केली. पण इथल्या व्यवस्थापनाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही समीर वानखेडे यांचे ना समर्थक आहोत ना विरोधक आहोत. आम्ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत."
यावेळी समीर वानखेडे यांनीही आपली बाजू मांडली. बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणास्थान असून ते आम्हाला प्रेरणा देतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे म्हणाले, "महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मी इथे आलो होतो. बाबासाहेबांकडून प्रोत्साहन मिळतं. आमचा जो संघर्ष सुरू आहे त्यासाठी आम्हाला बाबासाहेबांकडून प्रेरणा मिळाते."
 
'जय भीम सिनेमाचा इम्पॅक्ट'
आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडे सातत्याने चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचं खोटं प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
नवाब यांनी यासंदरर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं, "नेमकं काय झालं ते मला माहित नाही. पण बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही एका धर्माचे किंवा जातीचे नाहीत हे लोकांना समजलं पाहिजे.
 
"बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. समीर वानेखेडे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेले हे चांगलं आहे. सध्या 'जय भीम' सिनेमाची चर्चा आहे. 'जय भीम' म्हणजे अन्यायाविरोधातला लढा. त्याच इम्पॅक्टमुळे लोक याठिकाणी येत आहेत."