1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:33 IST)

वाचा, फडणवीस यांनी पडळकरांना का बोलावून घेतले

जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच जेजुरी संस्थान आणि भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यातला वाद समोर आला होता. या प्रकरणात  पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीकाही केली होती. अहिल्यादेवी आणि शरद पवार यांच्या विचारात साम्य नसल्याची टीकाही पडळकरांनी केली होती. पण शरद पवारांवर केलेली टीकेवर भाजपने त्यांची पाठराखण केली आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांच्या विधानावर कोणताही आक्षेप घेण्यासारखे ते वक्तव्य नसल्याचे सांगत त्यांना क्लिन चिट केली आहे. पण राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पडळकरांच्या भाषेविषयी आधीच भूमिका मांडलेली आहे. 
 
शरद पवारांना लक्ष्य करताना गोपिचंद पडळकर यांची भाषा म्हणजे ती धनगर समाजाची भाषा आहे. हा समाज शरद पवारांवर चिडलेला आहे, त्या समाजाची भाषाच तशी आहे अशी पाठराखण चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पण या सर्व प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या प्रसंगानंतर एक वेगळीच भूमिका घेतली होती. शरद पवारांवर गोपिचंद पडळकर यांनी टीका केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी याआधीच्या घटनेत व्यक्त केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सोलापूरात एका दौऱ्यानिमित्ताने आले होते. या दौऱ्यातच फडणवीस यांनी पडळकरांना बोलावून घेतले. त्यावेळी पडळकर यांचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला होता.