शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 31 जुलै 2021 (16:38 IST)

गणपतराव देशमुख यांनी 11 वेळा आमदार होऊनही स्वत:ला मतदारसंघापुरतं मर्यादित का ठेवलं?

फोटो साभार -सोशल मीडिया 
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गणपतरावांवर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती. सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 55 वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं.
 
विधानसभेतले सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या गणपतराव देशमुख यांनी 2019मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेच्या अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला.
 
11 वेळा तुम्ही आमदार म्हणून कशामुळे निवडून येऊ शकले, या प्रश्नावर गणपतराव देशमुख यांनी म्हटलं होतं, "यात जादू वगैरे काही नाही. लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद यामागे आहेत.
 
"माझी क्षमता आणि कुवत बघून मी स्वत:च्या मतदारसंघापुरतं मर्यादित राहायचं ठरवलं. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांच्यासाठीच काम करायला वेळ कमी पडतो. विधानसभेचं अधिवेशन संपलं की मी प्रत्येक गावाला वर्षातून किमान दोन वेळा भेटी देतो. विधानसभेत झालेले निर्णय सांगतो. लोकांशी संपर्क न चुकता ठेवतो आणि सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करतो."
 
1962 साली गणपतराव देशमुखांनी शेकापच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता ते सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्त्व करत होते.1972 साली काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी केला, तर 1995 साली काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी पराभव केला. हे दोन पराभव वगळता त्यांनी सांगोल्यातून सतत विजय मिळवला.
 
आपली बहुतांश कारकीर्द गणपतरावांनी विरोधी बाकांवरच काढली. मात्र, 1978 आणि 1999 सालची सरकारं त्याला अपवाद राहिली. कारण 1978 साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजशिष्टाचार,वन,खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती. तर 1999 साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता.
 
महाराष्ट्राच्या विधिमंडळात 55 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा 2017 साली सन्मान झाला होता.
 
 
सर्वपक्षीय नेत्यांनी गणपतराव देशमुखांना वाहिली आदरांजली
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी गणपतराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, गणपतराव देशमुख यांच्या निधनानं राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं.
 
"आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील," असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदरांजली वाहताना म्हटलं, "कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल."
 
"लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली," असंही पवार म्हणाले.
 
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपल्याच्या भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
तसंच, "राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली," असं अजित पवार पुढे म्हणाले.
 
तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, गणपतरावांचं निधन म्हणजे माझी वैयक्तिक हानी आहे.
"ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे," असं फडणवीस म्हणाले.