बुधवार, 4 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (16:00 IST)

अजित पवारांच्या विरोधात भाजप आंदोलनं का करत आहे?

ajit pawar
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात महाराष्ट्रात निदर्शनं सुरू आहेत. गेले काही दिवस महापुरुषांबद्दल नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांची चर्चा सुरू आहे. महापुरुषांच्या अवमानाबद्दलच अजित पवार विधानसभेत बोलत होते. यावेळेस त्यांनी छ. संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते असं विधान केलं. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभेत तात्काळ प्रतिक्रिया उमटली नसली तरी अधिवेशनानंतर त्यावर राजकीय नेते व्यक्त होत आहेत. संभाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावर अजित पवारांनी माफी मागावी यासाठी दोन दिवस आंदोलनं सुरू आहेत.  
 
‘धरणवीर असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये !’ अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटरवर दिली आहे. 
 
2 जानेवारीपासून पुणे, वढू तुळापूर, अमरावती, नाशिक, सोलापूर, चेंबूर अशा अनेक ठिकाणी अजित पवार यांचा निषेध करण्यात आला आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. 
 
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? 
अजित पवार यांच्यावर टीका होऊ लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
 
काल 2 जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे.
 
"छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो,” आव्हाड म्हणाले.
 
जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केल्याबद्दल त्यांचाही निषेध केला जात आहे.
 
भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ते ट्वीटरवर लिहितात, “आव्हाड, ठराविक मतांसाठी इतिहासाचे विकृतीकरण करून अकलेचे किती तारे तोडणार आहात ? औरंगजेबाच्या प्रेमाखातर अजून कोणत्या थराला जाणार आहात ? बेताल वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या @Awhadspeaks यांचा निषेध !” 

“इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. ज्या औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांना त्रास दिला, माताभगिनींवर अत्याचार केले, महाराष्ट्रातली देवळं तोडली. अशा औरंगजेबाचा पुळका ज्यांना येतो त्यांची वृत्ती कळून येते”, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.  तर अमोल कोल्हे यांनी एका व्हीडिओद्वारे अजित पवार यांची पाठराखण केली आहे.  

भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार लिहितात,  “काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत ! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.” 
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांचे वक्तव्य हे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' अशा पद्धतीचे असल्याचं म्हटलं.
 
"आपण चुकीचे बोललो हे अजित पवारांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे कालही धर्मवीर होते, आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरपर्यंत राहतील," असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे अजित पवारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हटलं.

अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असंही तुषार भोसले यांनी म्हटलं.
 
अभ्यासाशिवाय बोलू नका- माजी खासदार संभाजीराजे छत्रपती
राज्यसभेचे माजी सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे.
 
 छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं,संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत हे नक्की आहे,संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केलं हे कुणी नाकारू शकत नाही,त्यामुळे संभाजी महाराज हे धर्मवीर होते. 
 “मी नेहमी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून भाषणाची सुरुवात करतो यापुढे देखील करेन अजित पवार यांनी कोणता संदर्भ देऊन ते बोलले हे माहीत नाही,अभ्यास असल्याशिवाय कोणतंही वक्तव्य करू नये.”   “अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा पूर्णपणे चुकीचे आहे, सभागृहात ज्यावेळी बोलताना अभ्यास करूनच बोलावे लागते,माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती आहे,की इतिहासाबद्दल बोलताना इतिहास संशोधक यांच्याकडून माहिती घेऊन बोलले पाहिजे. धर्माचे रक्षक नव्हते हे बोलणं पूर्णपणे चुकीचे आहे,संभाजी महाराज केवळ धर्मवीर होते हे म्हणणारे देखील चुकीचे.धर्माच्या रक्षकाबरोबर स्वराज्यरक्षक देखील होते.”

Published By - Priya Dixit