गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (22:49 IST)

संजय राऊत किरीट सोमय्यांवर इतके का चिडले आहेत?

संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक नवीन आरोप, अनेक आरोपांचं खंडन आणि जोरदार शेरेबाजी केली.
 
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा 'मुलुंडचा दलाल' अशा शब्दांत उल्लेख करत राऊतांनी आपला राग व्यक्त केला. इतकंच नाही, त्यांनी किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्यांच्या आर्थिक हितसंबंधांबद्दलही राऊतांनी आरोप केले.
 
शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यातून विस्तव जात नाही हे जगजाहीर आहे. पण आता हा सामना सोमय्या विरुद्ध संजय राऊत असा का झाला आहे?
 
राऊतांचे सोमय्यांवर थेट आरोप
पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे शिवसेना वापरत असल्याचा आरोप झाला होता. PMC बँक घोटाळ्यात राकेश वाधवान हे प्रमुख आरोपी आहेत. राऊतांनी आरोप केला की वाधवान यांच्याकडून भाजपला 20 कोटी रुपये गेले आहेत. तसंच किरीट सोमय्यांचा मुलगा नील यांचे राकेश वाधनावशी आर्थिक संबंध आहेत. सोमय्यांच्या निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत वाधवानही भागीदार आहेत असा आरोप राऊतांनी केला.
 
नील सोमय्यांवर आणखी एक आरोप करताना राऊत म्हणाले आहेत की वसईत सात कोटी रुपयांना विकत घेतलेल्या जमिनीवर एक कंपनी उभी राहिली आणि या खरेदीसाठी पर्यावरणीय परवानगी म्हणजे Environmental Clearance नव्हता. या कंपनीचे डायरेक्टर नील सोमय्या आहेत. या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालून परवाने रद्द करण्याची तसंच नील सोमय्यांना अटक करण्याची मागणी राऊतांनी केली आहे.
संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना इतक्या आक्रमकपणे लक्ष्य का केलं याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणतात, "सोमय्या हा भाजपचा आरोपांचा चेहरा आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणं स्वाभाविक होतं. ही टीका फक्त सोमय्यांवर नव्हती तर केंद्र सरकारवर होती. राज्य सरकारच्या प्रतिमेला सातत्याने हादरे बसत होते. त्याचा सामना करण्याशिवाय पर्याय नाही हे सत्ताधारी पक्षांना लक्षात आलं. केंद्र सरकारला प्रत्युत्तर द्यायला संजय राऊत तयार होते. त्यातून आजची पत्रकार परिषद होती. महाराष्ट्र सरकारने आता ममता बॅनर्जींचा मार्ग स्वीकारला आहे असं वाटतं. केंद्रीय संस्थांनी सातत्याने त्रास दिला तर त्याचा प्रतिकार करण्याशिवाय गत्यंतर नाही हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे."
 
दैनिक सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "सेना आणि भाजपचे मार्ग वेगळे झाल्यावर किरीट सोमय्यांना जास्त संधी मिळायला लागली. पक्ष नेतृत्वाने त्यांना वेसण घातली नाही. ते सेनेवर सातत्याने आरोप करत गेले. त्यांच्यामागचं जे सत्य आहे. ते लोकांपर्यंत समजावून देणे याकडे त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं होतं. यातूनच ईडीच्या लोकांशी त्यांची मैत्री झाली म्हणून तो दही खिचडीचा आरोप राऊतांनी केला. सेनेची संस्कृती अशी आहे की ते त्यांच्या आरोपांना थेट उत्तर देतात. सेनेचे राजकारण थेट आणि आक्रमक आहे. त्यानुसार त्यांनी आज अपेक्षेप्रमाणे सोमय्यांचं नाव घेतलं."
 
त्या पुढे सांगतात, "गेल्या काही दिवसात सरकारवर जे आरोप झालेत त्यावर आता भरपूर चर्चा व्हायला लागली आहे. न्यायालयाने सुद्धा जी निरीक्षणं नोंदवली आहे ती सुद्धा कोणत्याही सरकारला विचार करण्याजोगी आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून आता चढाईचं धोरण सेनेने स्वीकारलं आहे. जनतेसमोर जाताना आपल्या पक्षाची प्रतिमा स्वच्छ आहे हे दाखवण्याचा पक्ष प्रयत्न करतातच. त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आजची ही पत्रकार परिषद होती."

राऊत विरुद्ध सोमय्या सामना
किरीट सोमय्या सातत्याने वेगवेगळे कथित भ्रष्टाचार उघडकीला आणत असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपल्या आरोपांचा मोर्चा वळवला आहे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडे.
 
कोव्हिड काळात रुग्णोपचारासाठी नवी मुंबई, ठाणे, पुणे इथल्या उभारल्या गेलेल्या जंबो कोव्हिड सेंटर्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. 'ज्या कंपनीला ही कंत्राटं मिळाली ती ब्लॅकलिस्टेड होती. या कंपनीची मालकी संजय राऊत यांच्या मुलींच्या व्यावसायिक भागीदाराकडे असल्यामुळे ही कंत्राटं दिली गेली. PMRDA मार्फत ही कंत्राटं दिली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री तसंच संजय राऊत यांचा या घोटाळ्याशी थेट संबंध आहे', असा सोमय्यांचा आरोप आहे.
 
पुण्यातील जंबो कोव्हिड सेंटरच्या संदर्भातील कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी सोमय्या गेले असताना शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला होता. त्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीत सोमय्या जखमीही झाले होते. पोलिसांनी काही शिवसेना कार्यकर्त्यांवर या प्रकरणात गुन्हेही नोंदवले आहेत. या सगळ्या प्रकाराबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना सोमय्यांनी असाही आरोप केला होता की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'माफिया सेना' चालवतात. मुख्यमंत्री आणि संजय राऊतांचा घोटाळा उघडकीला आणल्याबद्दल आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो आहे." पुण्यात झालेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल सोमय्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच केंद्रीय गृहसचिवांकडे निवेदनं दिली आहेत.
 
सोमय्यांचे हे आरोप आणि त्यावर राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणतात, "कधीही सरकार पाडण्याच्या गोष्टी असतील तर अशा वेळेला सोमय्या बाहेर येतात आणि आरोप करतात. भाजपा सरकार आलं की ते गुहेत जातात. यांना कोण सोडेल? कोणत्याही पक्षाचं सरकार असेल तरी पैशाचे गैरव्यवहार होतातच. जे लोक सत्तेत असतात त्यांचे आर्थिक लागेबांधे असतातच. त्यांना पुरावे देणारे असतातच ना. तसे ते आज दिले."
 
हे सगळं आत्ताच का घडतं आहे याबद्दल बोलताना राही भिडे म्हणतात, "हे सगळं महापालिकेच्या निवडणुकीसाठी चालू आहे. त्या महापालिकेवर भगवा फडकला आहे. शिवसेनेला भाजपची साथ नाही. त्या दोघांच्या साथीने महापालिका आणायची आहे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. तिघे एकत्र येतील. मात्र काँग्रेस सरकार पडू देत नाहीत. शिवसेनेला पूर्ण मदत करशील. जे आरोप किरीट सोमय्या करतात ते भाजपची महापालिकेत सरशी व्हावी म्हणूनच करताहेत त्यामुळे त्यांच्या आरोपांना तोडीस तोड उत्तर मिळणं स्वाभाविक आहे. प्रत्येक वेळेला किरीट सोमय्या आरोप करतात त्यामुळे आता शिवसेनाही मागे हटणार नाही हे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आलं आहे."
 
सोमय्यांचा सवाल - राऊत, ठाकरे माझ्या आरोपांना उत्तर का देत नाहीत?
संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना किरीट सोमय्या म्हणतात,
 
"मला त्यांची परिस्थिती समजते. माझ्याविरुद्ध आणखी एक केस, चौकशीचं मी स्वागत करतो. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. भ्रष्टाचार केलेला नाही. श्री. ठाकरे आणि राऊत कोव्हिड सेंटर घोटाळ्यावर का उत्तर देत नाहीत? प्रवीण राऊत, सुजित पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधावर? भ्रष्टाचाराविरूद्धचा माझा लढा सुरूच राहील."
सोमय्यांनी पुढे म्हटलं आहे. "2017 साली संजय राऊत आणि सामना वृत्तपत्राने याचप्रकारे माझी पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमय्या यांना बांधकाम कंपनीत बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी माझा मुलगा नीलचं नाव घेतलं आहे. आतापर्यंत या सरकारच्या नेत्यांनी माझ्याविरुद्ध 10 केस दाखल केल्या आहेत आणि तीन पाईपलाईनमध्ये आहेत."
राऊतांनी या पत्रकार परिषदेची घोषणा आधीच केली होती. ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतानाच किरीट सोमय्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाऊन कोव्हिड सेंटर भ्रष्टाचाराच्या आरोपांसंबंधी तक्रारही दाखल केली होती.